Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5. Solutions
विरांना सलामी (virana salami Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 विरांना सलामी
12th Marathi Guide Prashn uttar Chapter 5 विरांना सलामी Textbook Questions and Answers
(इ) कारणे लिहा.
(१) थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’ च्या स्मारकाला सलाम केला कारण …
उत्तर : लेखिकेसमोर कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांची स्मारके होती. सगळी बावीस-तेवीस वर्षांची तरुण मुले. मृत्यूलाच आव्हान देणारी ही मुले; यांना आशीर्वाद देण्याऐवजी श्रद्धांजली अर्पण करावी लागते या विचाराने लेखिका अंतर्बाहय थरारून उठली म्हणून.
(२) ‘मिशन लडाख’साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्त निवडला, कारण…
उत्तर : लेखिकेने विचार केला की राखीच्या एका धाग्यानं बहीण-भावाचं नात कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर सैनिकांविषयीची आपली कृतज्ञता योग्य प्रकारे व्यक्त होईल म्हणून.
(३) लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्या वरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होतं, कारण…
उत्तर : कारण एकदा नेहमीप्रमाणे काही प्रवाशांना घेऊन लेखिका द्रास – कारगिलहून लेहला परत येत होत्या. मध्ये खल्से नावाचे गाव लागते. तुफान पावसाने तिथला पूल तुटलाहोता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता आणि सोबत तरुण मुलींची जबाबदारी अशा संकटात लेखिका सापडली. माघारी फिरणे शक्य नाही आणि पुढची वाट बंद. त्यावेळी टॅफिक चेक पोस्टच्या सैनिकांनी या सगळ्यांच्या खाण्याची, राहण्याची सोय केली. देश रक्षणाबरोबर सैनिकांनी केलेले हे आणखीन एक उपकार. या उपकाराच्या भाराने दबून गेलेली लेखिका म्हणूनच अत्यंत विनम्रतेने म्हणते.
(४)समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण…
उत्तर : कारण नवीन तरुणांचे खऱ्या सैनिकात रूपांतर करणे हे आव्हानात्मक काम होत चाललं आहे असं कर्नल राणा यांना वाटतं. ते म्हणतात ज्या समाजातून ही मुलं येतात तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीनआस्मानाचा फरक आहे. त्यात मोबाईलमुळे त्याला घरच्या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे मन थोडंसं विचलित होतं. ध्येयापासून मन दूर जाण्याची शक्यता निर्माण होते. प्रशिक्षणात सैनिक घडवला जातो. पण वरील बाबींमुळे सैनिक घडवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात असं कर्नल राणा यांना वाटते.
(ई) पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.
(१) एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
उत्तर : सैनिक होणं ही एक वृत्ती आहे. आधी देशावर प्रेम, मग साथीदारावर प्रेम. मग शेवटी स्वतःवर प्रेम हे सैनिकी प्रशिक्षणाचं ब्रीदवाक्य आहे. पण असे असले तरी माणुसकीचा एक ओलावा त्यांच्याही मनात पाझरत असतो. अनुराधा प्रभुदेसाई या कारगिल युद्धभूमीला भेट देऊन अत्यंत भारावून गेल्या. सैनिकांच्या या अपार पराक्रमाची माहिती तरुणांना करून दयावी. म्हणून त्या नियमितपणे लडाखला भेट देऊ लागल्या. एकदा अशाच भेटीत एका मुलाने “मावशी, मी तुम्हाला मिठी मारू शकतो का?” असा प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिले, मलाच काय सगळ्यांना तुम्ही मिठी मारू शकता. मग गळाभेटीचा मोठा कार्यक्रम झाला. त्या जवानाच्या मावसबहिणीचं लग्न होतं. पण रजा रद्द झाल्याने तो लग्नाला जाऊ शकत नव्हता. ही कमतरता त्याने आणि इतर सैनिकांनी लेखिका आणि तिच्या सोबत्यांना प्रेमाची मिठी मारून भरून काढण्याचा प्रयत्न केला. सैनिकांच्या आव्हानात्मक, खडतर सैनिकी जीवनात हा एवढासा भावनिक ओलाव्याचा स्पर्श पण त्यांना प्रेरणादायी ठरतो असे या प्रसंगात दिसते.
(२)’सेवा परमो धर्म:’
उत्तर :सैनिक एका तत्त्वावर घडतो. ते तत्त्व म्हणजे प्रथम माझा देश, मग माझा सहकारी, सर्वात शेवटी मी. देशाविषयी प्रेम नसलेला तरुण सैनिक बनूच शकत नाही. युनिफॉर्ममधल्या या तरुणाला केवळ धाडस दाखवून चालत नाही तर प्रसंगी देशवासियांची संकटकाळी मदत करावी लागते. जो बंदूक घेऊन शत्रूवर धावून जातो, जो देशासाठी कित्येक जणांना ठार करू शकतो, तो खरा सैनिक असतोच; पण खरा सैनिक प्रत्येक जीवाची किंमत जाणतो. एकाही जीवाचं विनाकारण नुकसान होऊ नये म्हणून तो सतत प्रयत्नशील असतो. हीच अनुभूती अनुराधा प्रभुदेसाई यांनी लडाखच्या वेगवेगळ्या भेटींमध्ये घेतली. एकदा काही सहकाऱ्यांसह त्या कारगिल-द्रासला भेट देऊन लेहला परतत होत्या. त्यावेळी निसर्गाने एकदम रूप पालटले. रस्त्यात खल्से गाव लागते. नेमका तिथला पूल पावसात तुटला. पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला. माघारी फिरता येत नाही आणि बरोबर तरुण मुली! अशा संकटात ‘ट्रॅफिक चेक पोस्ट’च्या सैनिकांनी त्यांना मदत केली. छत्तीस लोकांचे जेवण अत्यंत तत्परतेने तयार केले. सर्वांची चहापाण्याची, वास्तव्याची आत्मीयतेने सोय केली. तेव्हा अनुराधाताईंना अनुभव आला की ‘सेवा परमो धर्मः’ अर्थात अडलेल्यांची सेवा करणे हे सैनिकी जीवनाचे परम कर्तव्य आहे, नव्हे तो त्यांचा धर्मच आहे.
(३) गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
उत्तर : माणसावर जेव्हा संकट येते तेव्हा तो अगतिक होतो. हे जर मानवनिर्मित संकट असेल तर ते दूर होईल अशी आशाही करू शकतो. पण निसर्गावर कोणाचा ताबा नाही. त्याच्या सामर्थ्यापुढे सगळे हतबल आहेत. असाहाय्य आहेत. मग अशा संकटात कोणीतरी तारणहार भेटला की अश्रूंचे रूपांतर हिऱ्यांमध्ये होते याचा अनुभव लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना लडाख भेटीत आला. कारगिल युद्धभूमीवर उभ्या असताना, भारतीय सैनिकांच्या स्मारकांसमोर उभ्या असताना त्यांनी निश्चय
केला की या भूमीवर परत परत येईन. बरोबर देशातल्या तरुणांना घेऊन येईन. सैनिक व सामान्य जनता यांत मैत्रीचा पूल बांधेन.
त्याप्रमाणे दरवर्षी त्या लडाखला जात राहिल्या. सैनिक नावाचा माणूस समजून घेऊ लागल्या. हा बंध पुढे खूप घट्ट झाला. एकदा कारगिल युद्धभूमीला भेट देऊन त्या छत्तीस जणांबरोबर लेहला परतत होत्या. वाटेत तुफान पाऊस लागला. भयाण रात्र पसरलेली आणि बरोबर तरुण मुली ! प्रसंग मोठा बाका होता. रस्त्यात खल्से गावात पावसाने पूलच तुटला होता. पुढे जाण्याचा मार्ग बंद होता. अशा संकटात ट्रैफिक चेक पोस्टचे सैनिक यांच्या मदतीला धावून आले. एवढ्या रात्री सगळ्यांसाठी त्यांनी जेवण बनविले. राहण्याची व्यवस्था केली. कारण शत्रूबरोबर युद्ध करणे एवढेच सैन्याचे काम नसते तर संकटसमयी नागरिकांना मदत करणे हा त्यांचा धर्म असतो. या मदतीमुळे अनुराधा यांच्यावरचे संकटाचे मळभ दूर झाले. सैनिकांकडून अपार आत्मीयता आणि प्रेम त्यांना मिळाले आणि दुःखाश्रू हसणाऱ्या हिऱ्यांमध्ये रूपांतरित झाले.
(४) लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
उत्तर : वरील वाक्य हे ब्रिगेडिअर ठाकूर यांनी अनुराधा प्रभुदेसाई यांना उद्देशून काढले आहे. लडाख पर्यटनाला गेलेल्या अनुराधा प्रभुदेसाई केवळ ऊर्जा घेऊन परतल्या नाहीत तर एक नवीन दिशा घेऊन परत आल्या. सैनिकांचा पराक्रम, त्यांचा त्याग, धैर्य हे सगळं तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी ‘लक्ष्य फाऊंडेशनची’ स्थापना केली. भारत मातेच्या तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून सैनिकांविषयी जाज्ज्वल्य अभिमान त्यांच्या मनात निर्माण करणे आणि सैन्यदलात जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा ‘लक्ष्य फाऊंडेशन’चा प्रमुख हेतू आहे. दरवर्षी अनेक तरुण-तरुणींना घेऊन ‘खरा सैनिक’ म्हणजे काय हे त्यांना समजावून देतात. त्यासाठी ‘दिवाली विथ माय सोल्जर’, ‘व्हेलेंटाईन विथ माय सोल्जर’, ‘सैनिकांसोबत युवा प्रेरणा’, ‘मेरा देश मेरी प्रेरणा’ यांसारख्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करतात. इतकंच नव्हे तर ‘भारताच्या ‘उदया’साठी आपला ‘आज’ देणारा सैनिक’ लेखणीच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, दृक-श्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहचवतात. याच त्यांच्या कार्याचा भाग म्हणून त्या ब्रिगेडियर ठाकूर यांना त्या भेटल्या. ‘त्यांच्या या कामामुळे समाजात सैन्याविषयी आदरभाव जागृत व्हायला मदतच होते आहे, तरुण सैन्यदलाकडे वळत आहेत हे चित्र खूप आशादायी आहे’ असे ब्रिगेडियर ठाकूर त्यांना म्हणाले. अनुराधा ताईंनी पाच वर्षांपर्यंत हे काम करण्याचा निश्चय केला होता. पण या कामाचं मोल ‘अनमोल’ आहे हे जाणून ब्रिगेडिअर ठाकूर वरील वाक्य उद्गारतात.
★ कृती – २. व्याकरण
(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
(१) जमीन अस्मानाचा फरक असणे -प्रचंड फरक असणे, खूप मोठी तफावत असणे. –
वाक्य: झोपडपट्टीत राहणारी माणसं आणि उंच बहुमजली इमारतीत राहणारी माणसं यांच्या जीवनशैलीत जमीन अस्मानाचा फरक असतो.
(२) अंगावर काटा येणे – भीतीने अंगावर शहारा येणे. वाक्य: बांधावर आडवा पडलेला पिवळाधम्मक साप पाहून गणूच्या अंगावर भीतीने काटा आला.
(३) आग ओकणे– मोठ्या ज्वाळा बाहेर येणे. वाक्य: कारगिल युद्धात शत्रूच्या तोफा पहाडावरून भारतीय सैन्यावर आग ओकत होत्या.
(४) मनातील मळभ दूर होणे– मनातली शंका दूर होणे. वाक्य: गैरसमजातून दूर झालेल्यां दोन मित्रांचा समोरासमोर संवाद झाला आणि दोघांच्या मनातील मळभ दूर झाले.
(ई) योग्य पर्याय निवडा व लिहा.
(१) तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग –
(अ) भावे प्रयोग (आ) कर्तरी प्रयोग. (इ) कर्मणी प्रयोग
उत्तर : (आ) कर्तरी प्रयोग
(२) त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग
(अ) कर्तरी प्रयोग (आ) भावे प्रयोग
(इ) कर्मणी प्रयोग उत्तर : (आ) भावे प्रयोग
(३) पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य –
(अ) त्यांनी आम्हाला दृक्-श्राव्य दालनात नेले.
(आ) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच.
(इ) आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता.
उत्तर: (इ) आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता.
- कृती ३. स्वमत :
(अ) ‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो।’, असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर : ‘वीरांना सलामी’ या पाठाच्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेल्या होत्या. तिथे गेल्यावर मात्र त्या अंतर्मुख झाल्या. कारगिल युद्धीभूमीवर उभ्या असताना युद्धाचा थरार त्यांनी जणू प्रत्यक्ष अनुभवला. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत त्या ‘ऑपरेशन विजय’ स्मारकासमोर उभ्या राहिल्या. समोर कारगिलच्या युद्धात पाकिस्तानने काबीज केलेल्या टेकड्या होत्या. पहाड होते. एकेक टेकडी, एकेक पहाड परत मिळवण्यासाठी धडधडणाऱ्या तोफेच्या माऱ्याला सामोरे जात जवानांनी पुन्हा या पर्वतरांगा सर केल्या आणि मातृभूमीचे ऋण फेडले. साक्षात मृत्यूला आव्हान देणाऱ्या या तेजोमय स्फुल्लिंगांची म्हणजेच शहीद जवानांची स्मारकं तिथे उभी होती. ज्यांना आशीर्वाद दयायच्या अशा वयाच्या जवानांच्या स्मारकाला सलामी दयावी लागते या विचाराने अनुराधा प्रभुदेसाई यांचं हृदय भरून आलं. त्याच वेळी त्यांना या युद्धावर आधारित फिल्म दाखवण्यात आली. या फिल्ममध्ये जवानांची राष्ट्रभक्ती, असामान्य कर्तृत्व, अदम्य साहस यांचं चित्रण होत. त्याचबरोबर एका शहीद जवानाच्या आईचे मनोगत होते. तिने देशासाठी आपला मुलाचे बलिदान दिले. ती लोकांना विनंती करते “तुम्ही बलिदान भलेही नका देऊ पण निदान देशावर प्रेम तर करा.” तिला हे वाक्य म्हणावे लागले कारण देशातील चंगळवाद, भौतिक सुखाची आस, आभासी दुनियेत रमणारे तरुण “हे सगळं तिच्या डोळ्यांसमोर होते. आपल्या मुलाच्या कुर्बानीची जगाला जाणीवदेखील नाही ही भावना तिला विव्हळ करत होती. म्हणून उद्विग्नतेने तिने वरील उद्गार काढले.
(आ) ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर स्वच्छ चारित्र्य, मातृभूमीविषयी अपार प्रेम, हृदयात मानवतेवर असलेली अढळ श्रद्धा या गोष्टी सैनिक बनण्यासाठी आवश्यक आहेत. लढाई, शस्त्रास्त्र, धैर्य, शौर्य हे जरी खरं असलं तरी सैनिक होण्यामागची पहिली भावना आहे प्रेम. ‘आधी देशावर प्रेम, मग साथीदारावर प्रेम मग स्वतःवर प्रेम’ हे सैनिकी प्रशिक्षणाचं ब्रीदवाक्यच आहे. युद्धात अपंग झालेले सैनिकसुद्धा “संधी मिळाली तर पुन्हा युद्धभूमीवर जाऊ.” असं म्हणतात. थोडक्यात सैनिक असणं म्हणजे आपणच आपल्या मानसिक कमकुवतेवर केलेली मात ! ब्रिगेडियर ठाकूर म्हणतात हा जोश, ही पॅशन, ही निष्ठा हल्लीच्या मुलांमध्ये आढळत नाही. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई दरवर्षी तरुण मुलामुलींना कारगिल – द्रास ची युद्धभूमी दाखवायला आणतात. जवानांच्या खडतर आयुष्याचा परिचय करून देतात. त्यामुळे कुठेतरी शहरी माणसं आणि सैनिक यांच्यात प्रेमाचा सेतू बांधला जातो. सैनिकांचीही त्यामुळे उमेद वाढते व सामान्य तरुणांमध्ये डिफेन्स सर्व्हिस जॉईन करण्याचे विचार घोळू लागतात. हे देशासाठी खूप महत्त्वपूर्ण काम आहे. जवानांचा हौसला बुलंद करणे गरजेचे आहे. हे काम अनुराधाताई सहजतेने करत होत्या. त्यांनी पाच वर्षांपर्यंतच हे काम करणार असं ठरवलं होतं. पण त्यांच्या कामाचं मोल लक्षात घेऊन ब्रिगेडिअर ठाकूर त्यांना म्हणतात की “कुशाग्र बुद्धीच्या मुलांची देशाला गरज आहे. तुम्ही असेच मुलांना घेऊन या. मुलांमध्ये देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटवत राहा. यातूनच पुढचे भविष्यातील सैनिक घडण्याची प्रक्रिया निर्माण होईल.”
(इ) ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. (सप्टें., २०२१)
उत्तर : अनुराधा प्रभुदेसाई या सामान्य पर्यटकापर्यंत लडाखला प्रवासी पर्यटक म्हणून गेल्या. कारगिल आणि द्रास या रणभूमीवर प्रत्यक्ष उभे राहताना सैन्य दलाचे साहस, निष्ठा, धैर्य या सर्व भावना त्यांनी संवेदनशीलतेने अनुभवल्या आणि त्या अंतर्बाहय थरारून गेल्या. मृत्यूच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारे कोवळ्या वयांचे सैनिक कारगिल युद्धात शहीद झाले. त्यांच्या स्मारकासमोर उभे राहून त्यांनी शपथ घेतली की सामान्य नागरिक आणि सैनिक यांत मी एक सेतू बांधेन. त्या शपथेनुसार त्या पुढे तरुण तरुणींना घेऊन कारगिल युद्धीभूमीवर जात राहिल्या. या प्रवासांत सैनिकांचे जीवन, त्यांची जिगर त्यांना अनेक वेळा अनुभवता आली.
एकदा ड्युटीवर उभ्या असलेल्या जवानाशी गप्पा मारून छत्तीस तासांनी त्या परत आल्या. पण तो जवान बदलीचा जवान न आल्याने तिथेच उभा होता. त्यांनी विचारले हे “कसं शक्य केलंस?” तो उद्गारला, “सिर्फ दिमाग में डाल देना है.” “
एकदा त्यांचा छत्तीस जणांचा ग्रुप पावसात अडकला. बाहेर मिट्ट काळोख आणि वादळी पाऊस. पुढे जाता येत नाही. मागे फिरणे शक्य नाही आणि बरोबर तरुण मुली! यावेळी आर्मीच्या ट्रॅफिक चेक पोस्टच्या सैनिकांनी त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवले.
हे सगळं त्या अनुभवत होत्या. मग त्यांना जाणवलं सैनिक म्हणजे केवळ शस्त्र घेऊन लढणे नाही. तर प्रत्येक मानवाच्या संकटकाळी मदत करणारा देवदूत म्हणजे सैनिक आहे. म्हणून त्या कृतज्ञतेने म्हणतात, “आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला.”
★ कृती – ४. अभिव्यक्ती
(अ) सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर : सैनिकी बाणा आणि लढाऊ वृत्ती ही सैनिकांच्या नसानसांत भिनलेली असते. सैनिक नेहमी देशाचं हित, कल्याण व संरक्षण यांना प्रथम महत्त्व देतो. हाताखालच्या लोकांचं हित, कल्याण व संरक्षण यांना दुसरा क्रम देतो तर स्वतःचे हित, कल्याण व संरक्षण यांना तिसरा क्रम देतो. सैनिक म्हटलं की आठवतो तो ऑलिव्ह ग्रीन रंगातील गणवेश, करडी शिस्त आणि इस्त्री केल्यासारखा चेहरा ठेवत चालणारा माणूस. पण या सर्वांच्या आत एक माणूस दडलेला असतो. ज्याच्या हृदयात अवघ्या मानवजातीविषयी अपार करुणा भरलेली असते.
सामान्य माणूस मात्र संरक्षण, लष्कर यांविषयी फारसा जागरूक नसतो. त्याला स्वतःच्या सुरक्षेची काळजी असते पण देशाची सुरक्षितता कधी कधी त्याच्या गावीही नसते. स्वत:च्या मुलाने सैनिकी पेशा निवडावा यासाठी धडपडणारे पालकही अपवादानेच आढळतात.
सैनिक जेव्हा तळहातावर शीर घेऊन सीमेवर गस्त घालत असतो; ऊन, वारे, थंडी यांची पर्वा न करता उ ५६ अंश सेल्सिअस तपमानात किंवा अधिक ५० अंश सेल्सिअस तपमानात देशसेवेसाठी उभा असतो तेव्हा सामान्य जनता शांततेने, सुखासमाधानानं क्रिकेट, नृत्यनाट्य महोत्सव, टिव्हीवरील अर्थहीन मालिका बघण्यात, इंटरनेटवरील आभासी विश्वात मग्न असते. मेजर सुभाष गावंड म्हणतात प्रत्येक भारतीयाने ‘देशासाठी देईन प्राण’ म्हणण्याऐवजी ‘देशासाठी घेईन प्राण’ असे म्हणायला हवे. ते म्हणतात देशाचा मानसन्मान राखण्यासाठी तरुणांनी सैन्यदलात ‘मरायला’ नव्हे तर मारायला’ जाणे गरजेचे आहे.
एकूणच सैनिक व सामान्य माणूस यांची तुलना केली तर जाणवतं की युरोपातील काही देश आणि सिंगापूरसारख्या काही देशांत एक वर्षाचं सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य आहे तसं भारतातही करायला पाहिजे. जेणेकरून जबाबदार नागरिक घडण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपल्या देशावर, इतिहासावर प्रेम करणारे नागरिक तयार होतील. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणारे नागरिक पहायला मिळतील.
आज करोनासारख्या माहामारीने सगळं जग थांबलेलं असतानाही घरात न बसता टवाळक्या करत रस्त्यावर फिरणारी माणसं पाहिली, धर्माच्या नावाने राजकारण करणारी माणसं पाहिली की पटते प्रत्येकाच्या आत सैनिक असणे किती गरजेचे आहे.
(आ) कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
उत्तर: कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी मानसिक शक्ती ही शारीरिक शक्तीपेक्षा मोठी असते. पण बऱ्याच वेळा आपण या शक्तीकडे दुर्लक्ष करतो. कोणतही काम पूर्णत्वाला नेण्याऐवजी मी थकलो, मी दमलो अशा शब्दांचा आधार घेतो. अगदी अभ्यासासारख्या छोट्या गोष्टीसाठी लक्ष केंद्रीत करणेही, आपल्याला जमत नाही. देवाच्या दारात दोन मिनिटे हात जोडून उभे असतानाही हजार गोष्टी आपल्या मनात पिंगा घालत असतात.
पण अनुराधा प्रभुदेसाई यांना भेटलेल्या तरुणाने मात्र कामाकडे, ध्येयाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी विकसित केली. तो एकाच चेकपोस्टवर छत्तीस तास पहारा देत होता कारण बदलीचा सैनिक आजारी असल्याने पोहोचू शकला नव्हता. अनुराधा ताईंनी जेव्हा त्याला विचारलं ‘हे कसं जमवलंस?’ तेव्हा तो सहज उद्गारला “सिर्फ दिमाग में डाल देना है।” म्हणजेच त्याने स्वतःसाठी दुसरा पर्याय उपलब्ध ठेवलाच नाही. म्हणून तो आपली ही वाढीव ड्युटी कुठलेही कारण, सबब न देता आनंदाने करू शकला. “
जीवनाचे हे सत्य आहे. अभ्यास न करण्यासाठी असंख्यपर्याय विदयार्थ्यांसमोर उभे असतात. इंटरनेटवरील आभासी दुनिया, तिथले खेळ या मोहाला विदयार्थी बळी पडतात आणि अभ्यासातले लक्ष उडून जाते. व्यसनाच्या अधीन असलेल्या तरुणांनी जर व्यसन करायला कोणता पर्याय उपलब्ध नाही, यातून बाहेर पडलेच पाहिजे असा निश्चय केला तर ते यातून सहज बाहेर येऊ शकतात. त्या सैनिकाचे हे शब्द प्रत्येक विदयार्थ्याने, माणसाने मनात कोरून ठेवले तर जगात अशक्य असे काहीच
नाही याची खात्री पटते.
कृतिपत्रिका – १
प्र. १. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कती सोडवा.
(अ) लेखिकेने भेट दिलेली लडाखमधील ठिकाणे
(१)………………………
(२)………………………
(३)………………………
(४)………………………
उत्तर : (१) नुब्राव्हॅली
(२) पँगाँग लेक
(३) द्रास
(४) कारगिल
(आ) ‘ऑपरेशन विजय’ स्मारकासमोरील पर्वत रांगा
(१)………………………
(२)………………………
(३)………………………
(४)………………………
उत्तर : (१) टायगर हिल
(२) पॉईंट ४८७
(३) थ्री पिपल
(४) इंडिया गेट
प्र. २. कारण लिहा.
टायगर हिलसमोर उभे असताना लेखिकेच्या अंगावर काटा आला कारण …
उत्तर : कारगिल युद्ध प्रत्यक्ष जिथे घडलं ती युदधभूमी म्हणजे टायगर हिलचा पायथा. १९९९ साली इथे प्रत्यक्ष युद्ध घडलं तेव्हा काय उत्पात घडला असेल या कल्पनेने टायगर हिलसमोर उभे असताना लेखिकेच्या अंगावर काटा आला.
प्र. ३. स्वमत / अभिव्यक्ती
•सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या एखादया प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
यावर्षी पावसाने कहरच केला होता.एरव्ही येरे येरे पावसा’ म्हणणारे सगळे जण ‘रेन रेन गो अवे असे’ म्हणत होते. पावसाने सामान्य माणसांचे जीवनच थांबले होते. अशा वेळी महाराष्ट्रातील मांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांची अवस्था अत्यंत वाईट होती. पुराचं पाणी घराघरात शिरलेलं. पाण्याची पातळी पार ५६ फुटांपर्यंत पोहोचली होती. प्रशासन यंत्रणा हतबल झाली होती. आतल्या गावापर्यंत पोहोचण्याची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. रस्ते पाण्याखाली गेलेले. कोल्हापूरमध्ये तर २९ राजमार्ग आणि ५८ प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण ८७ रस्ते व ३७ पूल पाण्याखाली गेले होते. त्यावेळी धावून आली ती सैनिकी वर्दीतील माणसं. साक्षात देवदूतच! ९५ बोटी आणि ५०१ जवान कार्यरत झाले. लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. खरंच आहे शौर्य, निर्धार, निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आपले भारतीय सैनिक. सियाचेनच्या उणे ५६ अंश सेल्सिअस तपमानापासून, राजस्थानच्या अधिक ५० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत पराक्रमाचा ठसा उमटविणारा असा हा सैनिक, ३०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, घोंगावणाऱ्या नदया, बुलंद पहाड या सर्वांचा सामना करत सीमेवर डोळ्यात तेल घालून जागा असतो म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा, कर्तव्यकठोर, निश्चयातही माणुसकी जपणारा सैनिक हा सिनेमाच्या पडद्यावर दिसणाऱ्या, खोट्या नायकाच्या तुलनेत खरा हिरो असतो हे अशा कठीण प्रसंगी समजते. सैनिक हो तुमच्या कार्याला
सलाम !
प्र. २. स्वमत / अभिव्यक्ती
*शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : मराठीतील प्रसिद्ध लेखिका, लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या ‘वीरांना सलामी या पाठातील प्रस्तुतचा उतारा आहे. कारगिलच्या युद्धभूमीवर उभारलेल्या ‘ऑपरेशन विजय’ स्मारकात लेखिका कारगिल युद्धावरील एक फिल्म बघते. या फिल्मच्या शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईच्या तोंडचे शब्द ऐकून लेखिका खूपच अस्वस्थ
होते.चाबकाने मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षाही कितीतरी
अधिक पटीने लेखिकेच्या मनाला वेदना होतात. ‘सेवा परमो धर्मः’ वृत्तीने, अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत सीमेवरील प्रत्येक सैनिक देशरक्षणाचे काम प्रामाणिकपणे करीत असतात. सीमेवर तैनात असणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या अंतःकरणातील प्रखर राष्ट्रनिष्ठेची भावना मृत्युचीही पर्वा करीत नाही. असामान्य कर्तृत्व दाखविण्याची आलेली संधी कोणीही सोडत नाही. देशासाठीच त्याचं जगणं व मरणं असतं. आपल्या घरादारापासून दूरवर अंतरावरील सीमेवर सजगतेने कर्तव्य बजावणाऱ्या या सैनिकांच्या जीवावरच आपण आपल्या परिवारात सुरक्षितपणे राहात असतो. सीमेवर पहारा करणाऱ्या या असंख्य सैनिकांमुळेच आपले दैनंदिन जगणे सुखावह रितीने सुरू असते. ‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोड़ासा प्यार तो करो’ हे शहीद वीराच्या आईचे शब्द लेखिकेला अस्वस्थ करून सोडतात. आपले मध्यम वर्गीय मानसिकता फक्त स्वतःचा आणि स्वत:चाच विचार करते. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग यांचा अर्थच आपणास समजलेला नाही. आपले देशप्रेम देखील वरवरचे. आपल्या फायदयापुरतेच सिमीत. देशासाठी बलिदानाला नेहमी तयार असणारा सैनिक व आपण देशवासीय यांच्यातील तफावत अस्वस्थ करून सोडते. देशसेवेसाठी अखंड उभा असणारा सैनिक व आपल्या सुखाचाच विचार करणारे आम्ही. देशातल्या सगळ्या सोयी-सुविधांचा उपभोग घेणारे आम्ही व सीमेवरचा सैनिक यांच्या दैनंदिन जीवनात किती फरक आहे. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच सिमीत नाही. प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाबद्दलच्या स्वतःच्या कर्तव्याची जाण असली पाहिजे. वीरांच्या बलिदानातून आपण प्रेरणा घेऊन जवानांसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. ‘मेरा भारत महान’ बनविण्यात माझा, तुमचा नव्हे आपल्या सर्वांचाच हातभा पाहिजे. धर्म, जात, प्रांत, भाषा यांना सोडून देऊन केवळ भारतीयत्व मनात जागे ठेवले पाहिजे.
(अ) सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर 🙁 उत्तरासाठी कृती- ४. अभिव्यक्ती मधील (अ) चे उत्तर पहा.)
प्र. २. प्रयोग ओळखा. (भावे, कर्तरी, कर्मणी)
(१) ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकापर्यंत पोहोचलो.
उत्तर : भावे प्रयोग
प्र. ३. वाक्याचे प्रश्नार्थी रूप लिहा.
(१)१९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनेही अंगावर काटा आला.
उत्तर : १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेनं अंगावर काटा आल्याशिवाय राहिल काय ?
उपक्रम
(अ) रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखाद्या सैनिकाची किंवा माजी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
उत्तर : सेनादलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची मुलाखत. (व्यक्तिगत मुलाखत / प्रकट मुलाखत)
सेनादलातून कर्नल म्हणून निवृत्त झालेल्या ले. कर्नल अशोक दातार यांची मुलाखत.
अभिवादन करून आत प्रवेश करावा.
नमस्कार कर्नल साहेब, सर्व प्रथम तुम्हाला एक ‘कडक सॅल्यूट’. आता आपण संवादाला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे.
(१) कर्नल साहेब, सैन्यदलात आपला प्रवेश कसा झाला ?
(२) सैन्यदलातील आपले खडतर प्रशिक्षण कोठे व कशाप्रकारे झाले ?
(३) आपल्या सेवाकालावधीतील प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्याची संधी किती वेळा प्राप्त झाली ?
(४) सेनादलातील शिस्तप्रिय जीवनाचा निवृत्तीनंतर फायदा कशा प्रकारे होतो ?
(५) पाकिस्तानच्या छुप्या दहशतवादी कारवायांबद्दल आपले मत सांगा.
(६) सेनादलातून निवृत्त झाल्यावर आपणास कोणत्या प्रकारच्या सवलती मिळतात ? कशा प्रकारे ?
(७) तरुणांसाठी सेनादलात कोणत्या संधी असतात ?
(८) तरुणांनी सैनिकी पेशाकडे वळावे यांसाठी कोणते उपक्रम राबवावे असे आपणास वाटते ?
(९) साक्षात मृत्यूचा सामना करावा लागला असा एखादा प्रसंग सांगू शकाल का ?
(१०) देशातील नागरिकांना कोणता संदेश दयाल ?
धन्यवाद! कर्नल साहेब.
(आ) पाठात आलेले आर्मीशी संबंधित शब्द शोधा व त्यांचे अर्थ जाणून घ्या.
(१) रेजिमेंट (regiment) कर्नलच्या हुकमतीखाली चालणाऱ्या सैनिकांचा गट, लष्करी तुकडी.
(२) कर्नल (colonel) – लष्करातील उच्च श्रेणीचा एक अधिकारी.
(३) ब्रिगेडियर (Brigadier ) लष्करातील वरिष्ठ अधिकारी, पथक प्रमुख. –
(४) ट्रॅफिक चेक पोस्ट (T.C.P.) असलेले सैनिकी नाके. – वाहतूक तपासणी
(५) आर्मी पोस्ट (Army Post)- चौकी
(६) डिफेन्स सर्व्हिसेस (Defence services) – संरक्षक सेवा दले.
तोंडी परीक्षा
(अ)’विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ’ हाप्रसंग तुमच्या शब्दांत थोडक्यात सांगा.
उत्तर : २००४ मध्ये निव्वळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी ‘कारगिल युद्धभूमी’ला भेट दिली. लडाखमधील लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक असा रमणीय प्रवास करून तीकारगिल युद्धभूमीवरील ‘ऑपरेशन विजय’ स्मारक बघायला गेली आणि तिच्या विचारांमध्ये प्रवृत्तीमध्ये अंतर्बाहय बदल घडून आला. शौर्य, निर्धार, निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक असणारा सैनिक विपरित परिस्थितीत, ऊन-वारा-पाऊस- थंडी यांच्याशी झुंजत सीमेवर डोळ्यात तेल घालून जागा असतो, म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. याचा साक्षात्कार तिला कारगिल भूमीवर होतो. सैनिक दगाबाज दुष्मनाचा वार आपल्या निधड्या छातीवर झेलतो, म्हणून आनंदात आपण सण, उत्सव साजरे करतो या भावनेने ती कृतकृत्य होते. १९९९ साली भारत व पाकिस्तान यांच्यात जे कारगिल युद्ध घडले त्या भूमीवर ती प्रत्यक्ष उभी होती. डोळ्यांसमोर तोलोलिंग, टायगर हिल, पॉईंट ४८७५ अशा शिखररांगा बघताना ती भयचकित झाली. याच मातीतून धूळ अंगावर घेत १६०० फुटांच्या बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफेचा मारा चुकवत हे जवान टेकड्यांवर कसे पोहोचले असतील या विचाराने तिचा थरकाप उडाला. तिथेच ती युद्धावर आधारित फिल्म पाहते आणि अंतर्बाह्य बदलून जाते. आपल्या मध्यमवर्गीय सुरक्षित चाकोरीबद्ध जीवनाची तिला लाज वाटते. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या शब्दांचा खरा अर्थ तिला या युद्धभूमीवर उमगतो.आणि… ती शपथ घेते, “पुढील पाच वर्षे या प्रदेशात, या युद्धभूमीवर मी सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः तरुणांना घेऊन येईन. सैन्यातल्या वीरांचे भाट होऊन मी त्यांची कवनं गाईन आणि या भूमीवर वीरांना सलामी देईन. सर्व वीरांची माता होईन.”
केवळ प्रतिज्ञा करून त्या थांबल्या नाहीत तर खरोखर त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. गेली कित्येक वर्ष त्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा आदराचा, आपुलकीचा सेतू बांधत आहेत. त्यासाठी ‘लक्ष्य फाऊंडेशन’ सारखी संस्था त्यांनी उभारली. ‘दिवाली विथ माय सोल्जर’, ‘व्हॅलेंटाईन विथ माय सोल्जर’, सैनिकांसोबत ‘युवा प्रेरणा’ यांसारखे उपक्रम त्या सातत्याने राबवतात. सैनिकांच्या भेटीला तरुणांना घेऊन जातात. दुर्गम सीमारेषांचं दर्शन युवकांना घडवतात. म्हणूनच भारतीय समाज आज आदराने त्यांचा उल्लेख ‘सीमेवरील जवानांची माऊली’ म्हणून करतो.
(आ) ‘मी सैनिक होणार’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.
उत्तर : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
मी सागर जगताप, इयत्ता १२ वी, राजर्षि शाहू महाराज
महाविदयालय, सांगली. आज माझ्या सैनिकांविषयी असलेल्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करतोय. मी अशा शहरात राहतो जिथे सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मी सुद्धा अगदी रोजच मस्ती-मजा यात गुंग होतो. हॉटेलिंग, पार्टी हे सगळ नित्य नियमाने चालूच होते. त्याचवेळी माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. आमच्या महाविद्यालयामध्ये मेजर सुभाष गावंड यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
ते आले तेच मुळी लष्करी गणवेश धारण केलेल्या पेहरावात. आमच्या महाविदयालयातील एन. एस. एस. च्या विदयार्थ्यांनी त्यांना सलामी दिली. त्यांनी एक कडक सॅल्यूट करून महाविदयालयात भारताचा तिरंगा फडकावला. मग राष्ट्रगान झाले. त्यानंतर मेजर गावंड बोलायला उभे राहिले. त्यांची उंच शिडशिडीत मूर्ती, करडी नजर, धीरगंभीर व्यक्तिमत्त्व पाहून आम्ही सगळेच भारावलो होतो. ‘युद्धस्य कथा रम्य’ या न्यायाने त्यांच्या कथनात आम्ही रमलो होतो. थोडी भीती, थोडे आश्चर्य, जवानांविषयी प्रेम, राष्ट्रप्रेम सगळ्याच भावना एकदम जागृत झाल्या आणि अचानक ते म्हणाले, “तरुणांनी सैन्यात दाखल व्हायचं ते मरायला नाही तर शत्रूला मारायला.” त्यांच्या वाक्याने माझी विचारांची दिशाच बदलून गेली. पुढे ते म्हणाले की, श्रीमंत लोकांच्याही नशिबात नसलेली गाडी तुम्हांला चालवायला मिळते. तो म्हणजे रणगाडा. श्रीमंत व्यक्तींच्याही नशिबात हे सुख नाही. त्यांनी सैन्यदलात उपलब्ध असलेल्या संधी यांची सविस्तर चर्चा केली. त्यांच्या या जोशपूर्ण भाषणाने माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला आणि मी ठरवले माझे जीवन या
मातृभूमीसाठी वाहून घेईन आणि त्यासाठी मी सैनिक होईन.
लेखक परिचय
पर्यटनाला जाऊन नवीन ऊर्जा तर सर्वच घेऊन येतात, पण या ऊर्जेबरोबर नवी दिशा घेऊन, लडाख प्रवासावरून परत आलेल्या अनुराधा प्रभुदेसाई या आज ‘सीमेवरील जवानांच्या माऊली’ म्हणून सर्वत्र ओळखल्या जातात. कारगिल युद्ध भूमीवर जवानांच्या पराक्रमाने, त्यागाने भारावून जाऊन अत्यंत भारलेल्या अवस्थेत त्यांनी एक शपथ घेतली; ‘देशातील तरुण, सामान्य नागरिक आणि सीमेवर लढणाऱ्या पराक्रमी जवानांमध्ये मी एक सेतू बांधेन’. त्यासाठी त्यांनी बँकेतून निवृत्त झाल्यावर ‘लक्ष्य फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. भारतमातेच्या तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून सैनिकांविषयी जाज्ज्वल्य अभिमान त्यांच्या मनात निर्माण करणे आणि सैन्य दलात जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा ‘लक्ष्य फाऊंडेशनचा’ प्रमुख हेतू आहे.
दृकश्राव्य माध्यमातून जवानांच्या यशोगाथा उलगडून दाखवणे, तरुणांना सैन्य दलात जाण्यासाठी प्रवृत्त करणे, सैन्य दलात प्रवेश घेतलेल्यांचा सत्कार करणे, जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधून आवश्यकतेनुसार त्यांना मदत करणे इत्यादी विविध गोष्टींचे आयोजन त्या ‘लक्ष्य’च्या माध्यमातून करतात. ‘दिवाली विथ माय सोल्जर’, ‘व्हेलेंटाईन विथ माय सोल्जर’, सैनिकांसोबत ‘युवा प्रेरणा’, ‘मेरा देश मेरी प्रेरणा’ यांसारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन त्या सातत्याने करतात.
‘तुमच्या ‘उदया’साठी आपला ‘आज’ देणारा सैनिक’ या पुस्तकाच्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई या सैनिक होणं म्हणजे नेमकं काय हे आपल्या लेखणीतून स्पष्ट करतात.
पाठ परिचय
‘
लक्ष्य फाऊंडेशनच्या’ संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई २००४ पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि
आसाम या आघाड्यांवरील सैनिकांशी संवाद साधत आहेत. या भेटींमध्ये सैन्य दलातील अनेक अधिकाऱ्यांना त्या भेटल्या. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या अनेक सैनिकांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आलेले अनुभव, मनातल्या समोर भावना त्यांनी प्रस्तुत पाठात आपल्या मांडल्या आहेत.
शौर्य, निर्धार, निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आपले भारतीय सैनिक ! सियाचेनच्या उणे ५६ अंश सेल्सिअस तापमानापासून, राजस्थानच्या अधिक ५० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत पराक्रमाचा ठसा उमटविणारा असा हा सैनिक, ३०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, घोंगावणाऱ्या नदया, बुलंद पहाड या सर्वांचा सामना करत सीमेवर डोळ्यात तेल घालून जागा असतो म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. सैनिक सीमेवर उभे आहेत म्हणून आपण जल्लोषात सण, उत्सव साजरे करू शकतो. ते दगाबाज दुष्मनाचा वार आपल्या निधड्या छातीवर झेलतात म्हणून आपण आनंदात दैनंदिन जीवन जगू शकतो. भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ मानणारा, कर्तव्यकठोर, निश्चयातही माणुसकी जपणारा सैनिक हा पडद्यावरच्या खोट्या हिरोगिरी करणाऱ्या नायकाच्या तुलनेत खरा हिरो आहे याचा साक्षात्कार हा पाठ वाचताना येतो.
२००४ मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला १९९९ चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. तेथे असलेल्या कारगिल विजयस्तंभाच्या साक्षीने ‘पुढील पाच वर्षे या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन’ अशी शपथ लेखिका घेते. लडाखमधील लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक असा प्रवास करून लेखिका कारगिल आणि द्रासमध्ये पोहोचते. १९९९ मध्ये जे कारगिल युद्ध घडलं त्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष उभी राहते. डोळ्यासमोर तोलोलिंग, टायगर हिल, पॉईंट ४८७५ अशा शिखररांगा बघताना ती भयचकित होते. याच मातीतून धूळ अंगावर घेत, १६,००० फुटांच्या बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफेचा मारा चुकवत, हे जवान या टेकड्यांवर कसे पोहोचले असतील या विचाराने तिचा थरकाप उडतो.
याच ठिकाणी कारगिल युद्धावर आधारित फिल्म ती पाहते आणि ती अंतर्बाह्य बदलून जाते. स्वत: च्या मध्यमवर्गीय सुरक्षित चाकोरीची तिला लाज वाटते. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या शब्दांचा खरा अर्थ तिला कारगिलच्या युद्धभूमीवर उमगतो. पुढील पाच वर्षे या भूमीवर सामान्य लोकांना विशेषत: तरुणांना घेऊन येईन अशी शपथ घेऊन लेखिका परत येते. रक्षाबंधनाचं
निमित्त साधून पुढच्या वर्षी चोवीस जणांना घेऊन परत कारगिलला जाते. १४ कोअरच्या हेडक्वार्टरमधील कर्नल झा त्यांची विनंती मान्य करून त्यांना भेटायला बोलावतात आणि ‘आज जे नातं सैनिकांबरोबर बांधलं ते कायमसाठी बांधा’ अशी विनंती अनुराधा प्रभुदेसाई यांना करतात. त्या विनंतीला मान देऊन अनुराधाताई तिथे तरुणांना घेऊन जातच राहिल्या. अनेक जवान त्यांना आई-मावशी समजून भेटत राहिले. एकदा तर ड्युटी संपली तरी बदलीचा सैनिक न आल्याने छत्तीस तास जागेवर उभा राहणारा जवान त्यांना भेटला. “इतका वेळ विश्रांती न घेता, हे तू कसं साध्य केलंस?” या त्यांच्या प्रश्नाला तो जवान सहज उत्तर देतो “सब कुछ आसान है, सिर्फ दिमाग में डाल देना है।” “
एकदा २००६ ला जणू लडाखमध्ये आभाळ फाटलं होतं. कारगिलला भेट देऊन त्यांचा चमू परत लेहकडे जायला निघाला होता आणि तेवढ्यात बातमी आली की, रस्त्यात मध्येच लागणारा खल्से गावाचा पूल तुटल्याने लेहकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यावेळी ट्रॅफिक चेक पोस्टच्या जवानांनी अत्यंत आत्मीयतेने सर्वांच्या भोजनाची आणि वास्तव्याची सोय केली.
असे अनेक अनुभव त्यांनी नंतरच्या लडाख भेटीत घेतले. भारतीय सेना आणि त्यांच्यातील हे ममत्वाचे नाते असेच बहरत गेले! चंगळवादी दुनियेत खऱ्या अर्थाने सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललेलं काम आहे.’ या कर्नल राणा आणि कर्नल झा यांच्या म्हणण्यातला मतितार्थ अनुराधा प्रभुदेसाई यांनी समजून घेतला. आपले सैनिक खरे हिरो आहेत. त्यांना जपलं पाहिजे. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे या जाणिवेतून त्यांनी सुरू केलेल्या ‘मिशन लडाख’ला हळूहळू यश येऊ लागले. त्यामुळे भाग्यश्रीसारखी एखादी तरुणी कारगिल युद्धभूमीवर उभी असताना सहज म्हणून जाते की “अनुमावशी, ह्या आसमंतात एक सुगंध पसरलेला आहे.” कणाकणांमधील कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास तिला संवेदनशीलतेने समजून घेता आला, हे पाहून अनुराधा यांना त्यांच्या ध्येयाला येत असलेलं यश अनुभवता आलं. त्या सैनिकांना परत परत भेटण्याचं आश्वासन देतात कारण सैनिक म्हणतात, ‘माघारी जेव्हा जाल परतून, ओळख दया आमची त्यांना आणि सांगा तुमच्या ‘उदया’साठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला. ‘
कठीण शब्द
सुळका- टेकडीवरील निमुळतं टोक ( a peak), निरपेक्ष – अपेक्षा न करता (selfless), नि:शब्द – शांत, शब्दांशिवाय ( noiselessly, without any word), कृतज्ञ-उपकार जाणणारा (grateful), धैर्यधर हिंमतवान (courageous), अदब नम्रता (humility, modesty ), दुर्दम्य आशावाद कधीच न मरणारी आशा (untamable optimism), त्राता – तारणहर्ता, रक्षणकर्ता ( a protector, a saviour), खूप मोठे साहस (an adventure), अदम्य साहस थोबाडात परत मळभ सावली (cloudiness ), चपराक बसणे (a slap on the face ), पुनरागमनाय येणे (coming again, returning), कुर्बान – बलिदान (sacrifice), प्रतिबंध अडथळा (an obstacle), यथोचित – योग्य (as is proper), भाट – स्तुतीपर गीत गाणारे राजगायक (a minstrel), बडेजावपणा – मोठेपणा ( greatness, grandeur), अहंकार गर्व (egoism, pride), कवन काव्य ( a poem), बुलंद – मजबूत (strong ), हौसला मनोबल (strength of mind), दुरापास्त कठीण, अवघड (extremely difficult).
टिपा
• पन्नादाई राजनिष्ठ स्त्री जिने राजस्थानच्या राजघराण्यासाठी स्वतःच्या पुत्राचे बलिदान दिले.
• पँगाँग लेक – १३४ किमी लांब पसरलेला लडाखमधील तलाव जो अर्धा भारत व अर्धा चीनमध्ये आहे. लेह ते पँगाँग हे अंतर २२३ किमी आहे. रंग बदलणारा हा तलाव लडाख भेटीचं मुख्य आकर्षण आहे.
•नुब्राव्हॅली – लेहपासून १६० किमी अंतरावर असलेले ठिकाण ज्याला ‘कोल्ड डेझर्ट’ म्हणून ओळखले जाते. दोन मदारी असलेले उंट ही इथली खासियत आहे. बर्फाच्छादित प्रदेशातील हे वाळवंट पाहायला जगभरातील लोक येतात.
•क्रूकट – सैनिकांना करावा लागणारा केसांचा बारीक कट.
•कॉनव्हॉय – एकत्रितपणे प्रवास करणारा सैन्यांच्या गाड्यांचा ताफा.
•काँबॅट वर्दी – सैनिकांचा पोषाख.
•बडी – सहकारी (सैनिकांचा खास शब्द )
•तोलोलिंग, थ्री पीपल, बत्रा टॉप, टायगर हिल – या टेकड्या कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने कपटाने जिंकून घेतल्या. हिवाळ्यात मरणाची थंडी असताना पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांच्या सैनिकांनी पहाडावरील छावण्या सोडून खाली जाणे असा नियम आहे. आपले सैनिक खाली आल्यावर पाकिस्तानी सैनिकांनी खाली जाण्याचे नाटक करत टेकड्यांवर परत चढाई केली आणि या पर्वतरांगांवर आपला कब्जा प्रस्थापित केला. या पर्वतरांगा परत मिळवण्यासाठी भारताने पाकिस्तान विरोधात जे युद्ध केले तेच हे कारगिल युद्ध. १९९९ ला या युद्धात अनेक सैनिक शहीद झाले. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे एका टेकडीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
•खल्सेचा पूल – कारगिल आणि लेह मार्गावरील एक गजबजलेले गाव. इथे भोजन आणि विश्रांतीसाठी सगळ्या गाड्या थांबतात.
•द्रास – कारगिल -भारत-पाक दरम्यान लढले गेलेले १९९९ चे कारगिल युद्ध प्रत्यक्षात कारगिलमध्ये नव्हे तर द्रासच्या भूमीवर लढले गेले. द्रास – कारगिल अंतर ६८ किलोमीटर आहे.
वाक्प्रचार
अप्रूप वाटणे =नवल वाटणे.
कृतज्ञ राहणे= उपकारांची जाण ठेवणे.
उत्पात होणे अनर्थ होणे.
नतमस्तक होणे =नम्र होणे.
नमस्कार करणे=सलाम करणे
विव्हळ अवस्था =दुःखी अवस्था.
धुमारे फुटणे= अंकुर येणे.
तैनात असणे -सज्ज असणे.
मायेची पाखर घालणे – प्रेम करणे.
मुखवटा चढवणे – मुळात नसलेले रूप धारण करणे.
आग ओकणे – प्रचंड आग बाहेर येणे, मोठ्या ज्वाला बाहेर येणे. भावनिक कल्लोळ शमणे – मन शांत होणे.
मळभ दूर होणे- मनातील शंका / गैरसमज फिटणे,
शरणागती पत्करणे – हार मानणे.
मर्दुमकी गाजवणे -खूप मोठा पराक्रम करणे.
हौसला बुलंद करणे – हिमंत करणे.
भावनिक सेतू बांधणे – प्रेमाचे नाते तयार होणे.
कार्यव्यग्र असणे – कामात गर्क असणे.
जमीन अस्मानाचा फरक असणे -खूपच फरक असणे
अंगावर काटा येणे- आनंद, भय शरीरावर शहारा येणे.
आश्चर्य इ. भावनांनी
–