Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter माहितीपत्रक (Mahitipatrak)2024

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter Solutions माहितीपत्रक ( Mahitipatrak Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter माहितीपत्रक
12th Marathi Guide Prashn uttar Chapter माहितीपत्रक Textbook Questions and Answers.

कृती

कृती- १. माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा. किंवा माहितीत्रकाचे स्वरूप विशद करा. (सप्टें., २०२१)

उत्तर :- माहितीपत्रक म्हणजे एखादया उत्पादन, सेवा वा संस्थांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे, परिचयात्मक असे पत्रक होय. माहितीपत्रकाच्या माध्यमातून एखादी संस्था आपल्या नवनवीन योजनांकडे, कंपन्या आपल्या नव्यानेच उत्पादित केलेल्या उत्पादनांकडे, गावात सुरू होणाऱ्या नवीन सेवेकडे ग्रहकांचे लक्ष वेधून घेते. माहितीपत्रक म्हणजे लोकांना आकर्षित करण्याचे लिखित स्वरूपाचे माध्यम आहे.

माहितीपत्रक लिखित स्वरूपात असल्याने ग्राहकाला हवी असलेली माहिती पाहिजे तेव्हा उपलब्ध होऊ शकते. कमीतकमी वेळात व अत्यंत कमी खर्चात माहितीपत्रकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचता येते. लोकांच्या मनात त्या योजनेबद्दल, उत्पादनाबद्दल वा संस्थेबद्दल कुतूहल वा औत्सुक्य जागे करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते.

नवनवीन बाजारपेठ काबीज करण्याची माहितीपत्रक ही पहिली पायरी असते. माहिती देणारा व माहिती घेणारा यांच्यात माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे त्या नवीन बाबींच्या जाहिरातीचे काम करीत असते. आजच्या स्पर्धात्मक युगात माहितीपत्रकाची गरज सर्वत्र

आहे. साध्या फळफळावळ वा भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्याकडून ते लक्षावधी रुपये किमतीच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. आपले वेगळेपण, वैशिष्ट्ये, ग्राहकाला होणारा फायदा या बाबी माहितीपत्रकाच्या निमित्ताने अधोरखित केल्या जातात.

Telegram group मध्ये जॉईन व्हा
  • कृती – २. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना धरून
    स्पष्ट करा.

(अ) आकर्षक मांडणी

(आ) भाषाशैली (सप्टें., २०२१)

उत्तर : (अ) माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी :

लिखित स्वरूपात असल्याने माहितीपत्रक हे त्याची आकर्षक मांडणी महत्त्वाची आहे. माहिती देण्याबरोबरच लोकमत आकर्षित करणे हा माहितीपत्रकाचा एक महत्त्वाचा हेतू आहे. आकर्षक अशा मांडणीमुळे माहितीपत्रक दिसताक्षणीच ते ‘वाचावेच’ असे वाटणे महत्त्वाचे आहे. इंग्रजीत

माहितीपत्रकाच्या आकर्षक अशा मांडणीस ‘लेआऊट’ असे म्हणतात. माहितीपत्रकाचा कागद दर्जेदार असावा. कागदावरील छपाई रंगीत असावी. योग्य अशा रंगसंगतीमुळे माहितीपत्रक आकर्षक होते.

माहितीपत्रकाचे पहिले पृष्ठ चित्ताकर्षक स्वरूपाचे असावे. योग्य अशा आकारात माहितीपत्रक लोकांसमोर यावे. शीर्षक वा बोधवाक्य मनाची पकड घेणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी त्या क्षेत्रातील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ यांची मदत घ्यावी.

माहितीपत्रक ही त्या कंपनीची आणि तिच्या उत्पादनांची, संस्थेची आणि तिच्या योजनांची, सेवा आणि सुविधांची पहिली ओळख असते. ही ओळख चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी माहितीपत्रकाची मांडणी ही आकर्षक असणे महत्त्वाचे आहे.

(आ) माहितीपत्रकाची भाषाशैली :

माहितीपत्रक हे केवळ पाहिले जात नाही तर ते वाचले जाते. माहितीपत्रक बघता बघता ते वाचावेसेही वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक व वेधक असणे आवश्यक आहे. माहितीपत्रकातील शब्दयोजना मनाला भिडणारी असावी. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणारी जिव्हाळ्याची भाषाशैली योग्य परिणाम साधते.

‘आमच्या कृषिपर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की, तुम्हांला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही’. एवढी सगळी माहिती ‘आता ताणतणावाला वेळ नाही’ एवढ्या चारच शब्दांत मनाला जाऊन भिडते. पाठ्यपुस्तकातील हुरडा पार्टीच्या माहितीपत्रकातील ‘तुमच्या आवडीची ! तुमच्या पसंतीची!!’ ‘तुमच्या मनातली’ हे शब्द नक्कीच मनाला जाऊन भिडतात. ‘मुलीचे लग्न करीत आहात. विवाहसमारंभाच्या व्यवस्थेच्या काळजीत आहात. काळजी सोडा, आम्ही आहोतच आपल्या मदतीला’ सारखे शब्द एक नवं जिव्हाळ्याचं नातं प्रस्थापित करतात. माहितीपत्रकातील जिव्हाळ्याची भाषा नक्कीच समोरच्या ग्राहकाच्या मनात घर करते. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची भाषा आकर्षक असणे खूप गरजेचे आहे. माहितीपत्रकातील मजकूर व रचनेत इतरांपेक्षा वेगळेपण असले पाहिजे.

★ कृती – ३. थोडक्यात महिती लिहा.

(अ) माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे
(आ) माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच
उत्तर :-(अ) माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे :

आधुनिक युगात माहितीपत्रकाची गरज सर्वच क्षेत्रांत निर्माण झाली आहे. आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत. हे दाखवण्यासाठी मोठ्या कल्पकतेने माहितीपत्रक तयार केले जाते. फळफळावळ व भाजीपाला विक्रेत्यापासून ते लाखो रुपयांच्या अलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासत असते. दिवाळी आली की, दिवाळीचा फराळ, रेडिमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणामाल, दिवाळी अंक यांची माहितीपत्रके तयार केली जातात. गावात नव्याने होणाऱ्या सोयीसुविधांसाठी, जसे हॉटेल, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर इ. ची माहितीपत्रके ग्राहकाला आपल्याकडे वळविण्याचे काम करतात आपले वेगळेपण सांगण्यासाठी विद्युत उपकरणे घरगुती वापराची उपकरणे, वाहने, औषधे, इलेक्ट्रानिक वस्तू इ. ची माहितीपत्रके तयार केली जातात.

नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी, आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडासंस्था, वैदयकीय सेव पुरविणारी हॉस्पिटल, पर्यटन संस्था आपली माहितीपत्रके तयार करतात. लोकमताला आपल्याकडे आकर्षित करायचे काम माहितीपत्रक करत असते.

(आ) माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातचः

ग्राहकाला आपल्याकडे वळविण्यासाठी मुख्यतः आकर्षक अशी माहितीपत्रके तयार केली जातात. माहितीपत्रकाच्या माध्यमातून इतरांपेक्षा आपले वेगळेपण सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या उत्पादनांकडे, नवनवीन योजनांकडे, संस्थेकडे लोकांनी डोकावून पहावे यासाठीची माहितीपत्रक ही एक महत्त्वाची खिडकी आहे. ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रके कल्पकतेने तयार केली जातात. युगात जाहिरात महत्त्वाची आहे.

आजच्या स्पर्धात्मक जाहिरातीच्या माध्यमातून चोखंदळ व चिकित्सक ग्राहकाला त्या उत्पादन वा सेवेकडे आकर्षित केले

जाते. माहितीपत्रक जनमनाला आकर्षित करण्याचे काम लिखित अशा स्वरूपात करते. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी ग्राहकाच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. नवीन उत्पादन, सेवा वा संस्थेची ती अप्रत्यक्षपणे माहितीरूपातील जाहिरातच असते. आपली माहिती जास्तीत जास्त आकर्षकपणे माहितीपत्रक रूपात मांडली जाते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी अधोरेखित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. माहितीपत्रक ही एकप्रकारे त्या उत्पादन, सेवा, सुविधांची अप्रत्यक्षपणे केलेली जाहिरातच असते.

  • कृती – ४. माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत स्पष्ट
    करा.

उत्तर: आजच्या जागतिकीकरण व व्यापारीकरणाच्या लाटेत सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धात्मक युगात आपल्या नवनव्या योजना, सुविधा व उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी माहितीपत्रकाचा सर्रास उपयोग केला जातो. दिवसेंदिवस अधिकाधिक चौकस व चिकित्सक झालेल्या ग्राहकाला बारीकसारीक तपशिलांनी युक्त अशी माहिती माहितीपत्रकाद्वारे दिली जाते. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत आज माहितीपत्रक आवश्यक झाले आहे.

जीवनवाटचालीत कोणताही व्यवहार करताना लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते. बारीकसारीक तपाशीलही ग्राहकाच्या दृष्टीने आवश्यक असतात. माहितीपत्रकाच्या माध्यमातून लिखित अशा स्वरूपातील माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचते. ग्राहकाच्या मानसिकतेला आपल्याकडे वळविण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. साध्या फळफळावळ वा भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासत असते.

आपली उत्पादने, सेवा व संस्थांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे एक उपयुक्त असे आहे. ग्राहकाच्या दृष्टीने आवश्यक असलेली महिती लिखित स्वरूपात दिल्याने ही माहिती ग्राहकाकडे नेहमी शकते. उपलब्ध माहितींची तुलना करून त्या योजनेत सहभाग घ्यावा की घेऊ नये हे ग्राहक ठरवत असतो. त्या विशिष्ट उत्पादनांची उपयुक्तता व त्यापासून होणारा आपला फायदा यांबाबतचा योग्य निर्णय ग्राहक घेऊ शकतो. एखादी सुविधा आपल्यासाठी उत्तम आहे. याबाबत खात्री पटल्यास त्या सेवेचा तो लाभ घेतो. थोडक्यात प्रत्येक विक्रेता व जागरूक ग्राहक या दोघांच्या दृष्टीने माहितीपत्रक हे उपयुक्त असते. माहितीपत्रकांच्या माध्यमातून त्या उत्पादन सेवेचे वेगळेपण, वैशिष्ट्य ग्राहकाच्या मनावर बिंबते आणि विक्रेता व ग्राहक यांच्यातील व्यवहार हा सुकर होतो.

कृती – ५. माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(मार्च, २०२२)

उत्तर : आपली उत्पादने, सेवा-सुविधा व संस्थांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे माहितीपत्रक हे एक उपयुक्त असे साधन आहे. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा व माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास खूप मोठी मदत होते. माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे होते. जनमताला आकर्षित करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक ग्राहकाची वृत्ती ही अधिक चौकस आणि चिकित्सक झाली आहे. संबंधित उत्पादन, सेवा, व्यवहाराबद्दलची बारीक-सारीक तपशिलांनी युक्त अशी माहिती प्रत्येक ग्राहकास हवी आहे. ग्राहकाच्या याच मानसिकतेची गरज पूर्ण करण्याचे काम माहितीपत्रक करीत असते. आज सर्वच क्षेत्रात माहितीपत्रक आवश्यक झाले आहे. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य ग्राहकास होणारा फायदा यांना अधोरेखित करण्याचे काम माहितीपत्रकाद्वारे केले जाते.

माहितीपत्रकाच्या माध्यमातून वाचकाच्या (ग्राहकाच्या) जिव्हाळ्याची माहिती लिखित स्वरूपात वस्तुनिष्ठपणे दिली जाते. म्हणूनच अनेकदा माहितीपत्रक वाचून झाल्यावरही ते फेकून न देता जपून ठेवले जाते. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणारी जिव्हाळ्याची भाषाशैली खूपच प्रभावशाली ठरते. ग्राहकास लिखित स्वरूपात माहिती दिल्याने ही माहिती ग्राहकाकडे नेहमी उपलब्ध असते. उपलब्ध माहितींची तुलना करून ग्राहकास योग्य, अचूक निर्णय घेता येतो. प्रत्येक विक्रेता व जागरूक ग्राहक या दोघांच्या दृष्टीने माहितीपत्रक हे उपयुक्त असते.

कृती -६. माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी थोडक्यात स्पष्ट करा.
(मार्च, २०२२)

उत्तर: ( उत्तरासाठी कृती २. मधील (आ) चे उत्तर पहा.)

*कृती -७. महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी
कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.

उत्तर :आज सर्वच क्षेत्रांत माहितीपत्रक आवश्यक झाले आहे. नव्यानचे सुरू होणारी एखादी सेवा ग्राहकांपर्यंत माहितीपत्रकाच्या रूपात पोहोचवली जाते. महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक पुढीलप्रमाणे :

• महाराष्ट्रीयन पद्धतीचे भोजनालय सुरू करण्यामागील उद्दिष्ट –

शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कामधंदयाच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब राहणाऱ्या मराठी माणसाला घरच्यासारखे जेवण मिळावे. घरच्यासारख्या जेवणाचा स्वाद लाभावा.

• महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाची खासियत :

●चुलीवरची ज्वारी आणि बाजरीची गरमागरम भाकरी

●डाळ / आमटी-भात

● काळ्या मसाल्याची घरच्या चवीची भाजी

● तोंडी लावण्यासाठी मिरचीचा ठेचा व कांदा, कैरीचे घरी बनवलेले लोणचे

● पिठलं / झुणका

● बदलणारा दररोजचा दोन वेळेचा मेनू :

●ऋतुमानानुसार उपलब्ध भाज्या, पालेभाज्या

● कडधान्याची ऊसळ

●पोळी / भाकरी आपल्या आवडीनुसार

●ताक/दही आपल्या पसंतीनुसार

●रविवारचा खास ‘महाराष्ट्रीयन मेनू’

● पुरणपोळी, भजी, कुरडई व पापड

● पुरणपोळीबरोबर आवडीनुसार गुळवणी / दूध

● मराठमोळ्या जेवणाचे वैशिश्ट्ये:-

●जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची विशेष व्यवस्था

●तांब्या व फुलपात्र

●जेवणाची वेळ=

सकाळी ११.३० ते ३.०० व रात्री ८.०० ते १०.३० पर्यंत.

सेवा :

वाढदिवस, वारसे, डोहाळेजेवण आदी कार्यक्रमांसाठी आपल्या पसंतीनुसार मेनू उपलब्ध. स्वच्छता व टापटीप, पिण्याचे शुद्ध पाणी, विनम्र व तत्पर अशी सेवा. एकदा याल तर कायमचे आठवणीत ठेवाल. अशा विविध मुद्द्यांना धरून माहितीपत्रक तयार करता येईल

कृतिपत्रिका – १,

प्र. १. कारण दया.

(अ) माहितीपत्रक एखादया खिडकीप्रमाणे असते, कारण……….

उत्तर: माहितीपत्रक एखादया खिडकीप्रमाणे असते, कारण खिडकीतून जसे बाहेर डोकावून बाहेरचे ज्ञान मिळवता येते तसेच नव्यानव्या योजनांकडे उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांना माहितीपत्रकाच्या माध्यमातून डोकावता येते.

प्र. २. एका वाक्यात उत्तर लिहा.

(अ) नवीन ग्राहक आणि नवीन बाजारपेठ मिळवण्याची पहिली पायरी कोणती आहे ?

उत्तर: त्या त्या उत्पदनांविषयी माहिती तयार करणे ही
नवीन ग्राहक आणि नवीन बाजारपेठ मिळवण्याची पहिली पायरी आहे.

माहितीपत्रकाचे स्वरूप : माहितीपत्रक म्हणजे……………..इत्यादींची पाहावयास
मिळतात. (उतारा: पाठ्यपुस्तक पृ. क्र. ९४)

(आ) माहितीपत्रकाचे फायदे लिहा.

(१). (२). (३). (४).

उत्तर:

(१) ग्राहकाला हवी असलेली माहिती त्याला सतत उपलब्ध होते.

(२)(माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत माहिती पोहचवते.

(३) माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे काम करते.

(४) माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते तयार होते.

(इ) खालील घटनेमागील कारण स्पष्ट करा.

घटना= (१) माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला. | कारण…….

उत्तर:-

घटना (१) माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला.

कारण-माहितीपत्रकामुळे कारण कारण लोकांच्या मनात उत्पादनाविषयी कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागृत झाले.

(ई) ज्या विषयांवर माहितीपत्रक तयार करता येईल असे चार विषय-

(१). (२). (३). (४).

उत्तर: (१) यंत्रसामग्री (२) कारखाने. (३) दिवाळी फराळ (४) रेडिमेड कपडे

(उ) खालील मुद्द्यांच्या आधारे उत्तर स्पष्ट करा.

[माहितीपत्रक – वैशिष्ट्यपूर्ण परिचय, जनमत आकर्षित करण्याचे साधन, कमी वेळात कमी खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचणे, कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागृत करणे, बाजारपेठ काबीज करण्यासाठी आवश्यक, फळफळावळ, भाजीपाला ते थेट कारखाने, औषधे, हॉटेल्स इत्यादींसाठी उपयुक्त ] (सप्टें., २०२१) माहितीपत्रक हे जाहिरातीचेच विस्तारीत रूप आहे. जाहिरात ही लघुरूपात असते. त्यात फार खोलात माहिती देता येत नाही. कारण ती जर वर्तमानपत्रात दयायची असेल तर जितकी मोठी जाहिरात तितके दर जास्त असतात. पण माहितीपत्रक हे थेट ग्राहकाच्या हातात जाते. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे आटोपशीर, आकर्षक माहितीपत्रक थेट ग्राहकांच्या हातात पडले तर ग्राहक व माहितीपत्रक देणारा दोघांमध्ये विश्वासाचा सेतू आपोआप बांधला जातो. त्यामुळे नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी माहितीपत्रक ही पहिली पायरी ठरते. माहितीपत्रक उत्कंठा व उत्सुकता वाढविण्यास मदत करते. ते संस्थेकडे, उत्पादनांकडे, योजनांकडे डोकावून बघण्यासाठी ग्राहकाला खिडकीच्या रूपात मदत करते. माहितीपत्रकाची गरज अगदी सर्वत्र असते. दिवाळी फराळ, रेडिमेड कपडे, खेळणी, पुस्तके, स्टेशनरी, वाहने, कारखाने ते पार अगदी फळफळावळ, भाजीपाला विक्री इत्यादी अनेक व्यवसायांसाठी माहितीपत्रक खूप उपयुक्त ठरते. थोडक्यात जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक उत्तम लिखित स्वरूपाचे आवाहन असते. नवीन व्यवसायात उतरणाऱ्या ‘स्टार्टअप’ कंपन्यांना थेट जाहिराती पेपरात वा टिव्हीवर देणे परवडणारे नसते. अशा संस्थांसाठी माहितीपत्रक हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे.



* कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती *
शिर्डी परिसरातील शिक्षणप्रेमी, कै. रामराम अण्णासाहेब कोते यांनी २०१० मध्ये नवजीवन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून नवजीवन कनिष्ठ महाविद्यालय विदयानगर परिसरातील स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरू केले. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेले, महाराष्ट्रातील हे पहिले स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आहे. देणगीदारांच्या दातृत्वातून आज अडीच एकराच्या भव्य जागेत महाविदयालय दिमाखाने उभे आहे. महाविदयालयात प्रामुख्याने कला शाखेच्या व वाणिज्य शाखेच्या दोन तुकड्यांपासून ३३० विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आम्ही केली आहे. पालक व विदयार्थ्यांच्या आग्रहास्तव शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून आम्ही नव्याने विज्ञान शाखेचा वर्ग सुरू करीत आहोत.
आमच्या कला वाणिज्य शाखेच्या तुकड्या अनुदानित स्वरूपाच्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून विज्ञान शाखेचा वर्ग आम्ही विनाअनुदानित स्वरूपात सुरू करीत आहोत. विदयार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल हाच आमचा ध्यास आहे. उज्ज्वल निकालाची परंपरा महाविदयालयाने आजपर्यंत कायम राखली आहे. विज्ञान शाखेबाबतही आमचे हेच धोरण व प्रयत्न राहतील. महाविदयालय ११.३० ला सुरू होते व ४.३० वाजता संपते. आम्हीच आमच्याबद्दल बोलणे चांगले नाही. तुम्ही आमच्या महाविदयालयात या. सुविधा, स्वच्छता व दर्जेदार निकालाच्या परंपरेला प्रत्यक्ष पहा आणि आपल्या पाल्याचा, नातेवाईकाचा प्रवेश निश्चित करा.
प्राचार्य

– डॉ. अविनाश शेटे

प्रास्ताविक:

आजच्या स्पर्धात्मक युगात आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत हे दाखविण्यासाठी, चौकस व चिकित्सक वृत्तीच्या ग्राहकाला आपल्याकडे वळवण्यासाठी माहितीपत्रकांचा सर्रास उपयोग केला जातो. आपले वेगळेपण व ग्राहकाला आपल्या सेवा व उत्पादनांमुळे होणारा फायदा यांबाबतची बारीकसारीक तपशिलांनी युक्त अशी माहिती लिखित स्वरूपात माहितीपत्रकाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. • विविध प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक संस्था, आर्थिक संस्था (पोस्ट, बँक, आयुर्विमा इ.) उत्पादक व लहान-मोठे व्यावसायिक (दुकानदार व घरोघरी जाऊन मालाची विक्री करणारे विक्रेते) आपल्या नवनवीन योजनांची उपयुक्त उत्पादनाची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांची माहिती माहितीपत्रकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत असतात. ग्राहकांच्या मानसिकतेचे समाधान करण्याचा एक प्रभावी असा मार्ग | म्हणजे माहितीपत्रक.

पत्रकाचे स्वरूप:

●माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रकाद्वारे उत्पादन सेवा व संस्थांची माहिती लोकांपर्यंत पोहोचते. नवनव्या योजना, उत्पादन, संस्थांकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते.

● माहितीपत्रक म्हणजे लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणे हे या आवाहनाचे उद्दिष्ट असते. नवनवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ही पहिली पायरी असते.

●माहितीपत्रकामुळे माहिती देणारा व माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होते. ग्राहकाला हवी असणारी माहिती लिखित स्वरूपात असल्याने ती पाहिजे तेव्हा उपलब्ध होते.

●माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. ग्राहकाच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे करते.

●माहितीपत्रकाच्या माध्यमातुन कमीतकमी वेळात व कमीतकमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचता येते.

●क्षेत्र व स्वरूपानुसार माहितीपत्रकाचे छोटी पुस्तिका / पत्रक, लहानसे चोपडे / हस्तपुस्तिका (Brochure), घडी पाडलेला कागद (Folder) व माहितीपत्रक (Prospectus) असे लेखन विषयाच्या गरजेनुसार प्रकार करता येतात.

माहितीयत्रकाची गरज:

आज सर्वच क्षेत्रांत माहितीपत्रकाची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी, नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी, आपले वेगळेपण व वैशिष्ट्य ग्राहकांच्या मनावर बिंबवण्यासाठी, ग्राहकाला होणारा फायदा अधोरेखित करण्यासाठी सर्वच क्षेत्रांत माहितीपत्रकाची गरज निर्माण झाली आहे.
फळफळावळ व भाजीपाला विक्रेत्यांपासून लक्ष्यावधी रुपयांच्या कार विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाला उत्पादन व सेवेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहितीपत्रक आवश्यक झाले आहे.
विविध प्रकारच्या संस्था सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन, वैदयकीय सेवा, बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र अशा अनेक ठिकाणी माहितीपत्रक आवश्यक आहे. –

माहितीपत्रक रचनेची वैशिश्ट्ये:-

●’माहिती’ला प्राधान्य :

माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य व वास्तव असावी. माहिती आटोपशीर, संक्षिप्त व वाचनीय असली पाहिजे. संस्था असल्यास संस्थेशी संबंधित आवश्यक व कायदेशीर बाबींची माहिती माहितीपत्रकात असणे बंधनकारक आहे. माहितीपत्रकात चुकीची व अतिशयोक्त माहिती नसावी.

माहितीची उपयुक्तता :

माहितीपत्रकातील माहितीची उपयुक्तता महत्त्वाची. माहितीपत्रक वाचून झाल्यावर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. वाचकांच्या जिव्हाळ्याची माहिती माहितीपत्रकास उपयोगमूल्य प्राप्त करून देते. माहितीचे वेगळेपण :

●माहितीचे वेगळेपण :

आपले माहितीपत्रक इतरांपेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असले पाहिजे. माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत वेगळेपण असावे. इतरांपेक्षा वेगळी, नवी व रोचक अशी माहिती, वेगळा लेआऊट, वेगळा आकार व वेगळा दृष्टिकोन माहिती देताना ठेवणे आवश्यक आहे.

आकर्षक मांडणी (लेआऊट):

आकर्षक अशा मांडणीमुळे माहितीपत्रक दिसताक्षणीच ते ‘वाचावेच’ अशी इच्छा होणे महत्त्वाचे. दर्जेदार कागद, रंगीत छपाई, योग्य असा आकार, लक्ष्यवेधक शीर्षक, ठसठशीत बोधवाक्य अशा अनेक प्रकारे माहितीपत्रक आकर्षक करता येते. संगणक तज्ज्ञ, त्या विशिष्ट क्षेत्रांतले कलाकार, चित्रकार यांची मदत घेऊन माहितीपत्रकाची मांडणी जास्तीत जास्त वेधक स्वरूपात करणे आवश्यक आहे.

भाषाशैली :

माहितीपत्रक हे केवळ पाहण्यासाठीच नाही तर वाचण्यासाठीही असते. माहितीपत्रक दिसताक्षणीच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक असावी. शब्दयोजना मनाला भिडणारी असावी. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणारी जिव्हाळ्याची भाषाशैली योग्य परिणाम साधते.

माहितीपत्रकासाठी आवश्यक मुददे:

माहितीपत्रक कशाच्या संदर्भात आहे, म्हणजेच माहितीपत्रकाचा विषय काय आहे यावर मुद्दे अवलंबून आहेत. माहितीपत्रक ही कंपनीची आणि तिच्या उत्पादनांची, एखादया संस्थेची आणि तिच्या योजनांची वा अभ्यासक्रमांची, परिसरात नव्यानेच सुरू झालेल्या सेवेची पहिली ओळख असते. माहितीपत्रक स्वरूपातील ही पहिली ओळखच उत्पादित वस्तूचे, संस्थेच्या नवीन उपक्रमांचे, नव्यानेच सुरू झालेल्या सेवा सुविधांचे भवितव्य ठरवत असते.

संस्थेचे माहितीपत्रक

सुरुवातीस संस्थेचे नाव, अगदी थोडक्यात प्रास्ताविक ( संस्था परिचय, स्थापना, वाटचाल व प्रगती इ. ) – संस्थेची वैशिष्ट्ये योजनांची / अभ्यासक्रमांची माहिती (माफक तपशिलासह ) उल्लेखनीय सोयी व सवलती – फी संदर्भातील माहिती व तपशील व्यवस्थापक / अधिकारी / संस्थाप्रमुखांचे नाव संस्थांचा / कार्यालयाचा संपूर्ण पत्ता इ. गोष्टी आवश्यक व महत्त्वाच्या असतात. –

उत्पादनाविषयीचे माहितीपत्रक :

कंपनीच्या उत्पादनासंबंधीच्या माहितीपत्रकात थोडक्यात नवीन उत्पादनाची ओळख उत्पादनाची वैशिष्ट्ये इतरांपेक्षा उत्पादनाची असणारे वेगळेपण – ग्राहकाला होणारा फायदा किंमत (विशिष्ट मुदतीपर्यंत किंमतीत सवलत असल्यास त्याबाबत उल्लेख) – विभागीय वितरक – शहरातील विक्रेतेविक्रीपश्चात सेवा – कंपनीच्या कार्यालयाचा संपूर्ण पत्ता इ. मुद्दे महत्त्वाचे आहेत. उपक्रम, उत्पादन व सेवा यांबद्दलची परिपूर्ण व संक्षिप्त स्वरूपातील माहिती माहितीपत्रकात आकर्षक |स्वरूपात देणे महत्त्वाचे आहे. माहितीपत्रकाच्या स्वरूपानुसार वरील मुद्द्यांमध्ये कमी-अधिक फेरफार होतील. – – –

समारोप:

ग्राहकांना आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही आज प्रत्येक व्यावसायिकाची गरज आहे. माहितीपत्रक तयार करणे याला एक व्यावसायिक मूल्य प्राप्त झाले आहे.

Leave a Comment