Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4: रे थांब जरा आषाढघना ( re thamb jara ashadhaghana )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4. Solutions रे थांब जरा आषाढघना ( re thamb jara ashadhaghana Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Textbook Questions and Answers

कृती

★ कृती – १. (अ) कारणे शोधा.

(१) कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण…………….

उत्तर: कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण आषाढघनाने केलेली करुणा डोळे भरून त्याला पहायची आहे.

(२) कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण…………..

उत्तरः कवीने आषाढघनाला उघडण्यास सांगितले, कारण त्याने काही काळापुरता इथे आसरा घेऊन त्याचे तुषार इथे पसरावेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(इ) एका शब्दात उत्तर लिहा.

(१) रोमांचित होणारी =
(२) नव्याने फुलणारी=
(३) लाजणाऱ्या=

उत्तरः

(१) रोमांचित होणारी =केतकी
(२) नव्याने फुलणारी=सोनचंपक
(३) लाजणाऱ्या= जाई

★ कती – ३. खालील ओळींचा अर्थ लिहा.

कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां

उत्तर: आषाढमेघ आल्याने, धरणीवर त्याची कृपा झाल्याने निसर्ग बहरून आला आहे. आषाढ महिन्यातील निसर्गाला पाहण्याकरता आषाढमेघ जरा वेळ तरीथांबावा असे कवी. बा. भ. बोरकर यांना वाटते. या काळात कणसांमध्ये दाणे धरू लागलेले असतात. कोवळ्या दाण्यातील दूध मधुर असते. ही कणसं अशा
दाण्यांनी भरू दे. फुलांचे देठ गोड अशा मधुर मधाने भरलेले असतात. पक्ष्यांच्या कंठातून मधुर गीतं ऐकू येत असतात. आजूबाजूला इतका गारवा असतो की तृणांच्या गवताच्या पात्यालाही शहारा येतो. गवताचं नाजूक पातंही लवलवतं आणि कोवळेपणाच्या वर्षावाने ती पूर्णतः न्हाऊन निघतात. इंद्रनील असे वातावरण वनांचे झालेले असताना त्यात ही भिरभिरणारी पिवळी फुलपाखरं सुंदर दिसतात. आषाढातील हे शामल, निळे मेघ त्यात ही फुलपाखरं असा रम्य देखावा वनात पहायला मिळतो. या कडव्यामध्ये आश्लेषा नक्षत्राचा उल्लेख करून त्या नक्षत्रामध्ये येणाऱ्या पावसांच्या सरींचे खास वर्णन कवी करतात. फुलपाखरांसाठी पिसोळी हा शब्द मालवणी भाषेतील वापरल्यामुळे, त्यांच्या पिसांचे थवे कसे भिरभिरत असतील हे सौंदर्य येथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पिवळ्या रंगाच्या या फुलपाखरांचे पंख पिवळे आहेत आणि त्यावर उन्हे आल्याने ते रत्नांसारखे खुलून दिसत आहेत. याला रत्नकळा ही उपमा दिल्यामुळे त्या फुलपाखरांचे आणि कवितेचेही सौंदर्य खुलून आले आहे.

कृती – ४. काव्यसौंदर्य.

आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना,

या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर: ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतून कवी बा. भ. बोरकर आषाढघनालाच थांबण्याची विनंती करतात. आषाढसरींनी तृप्त झालेली धरणी पूर्णत: फुलून गेली आहे. आपणच जन्म घातलेल्या तान्हुल्याच्या नाना कळा पाहण्यात पालक आनंद मानतात तसाच आनंद आषाढघनाला मिळावा असे कवी बा. भ. बोरकर यांना वाटते. म्हणून ते आषाढघनाला या निसर्गाचे विभ्रम पाहण्यासाठी विनंती करतात. त्यासाठी निसर्गातील विविध घटकांचे वर्णन करताना त्याला मानवी भावनांचा स्पर्शदेखील ते करतात. कवितेचे सौंदर्य खुलावे याकरता संस्कृत तर कधी मालवणी बोलीभाषेतील शब्दप्रयोग त्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे कवितेची नजाकत वाढलेली दिसते.

आषाढ महिन्यात आश्लेषा नक्षत्र येतं. आश्लेषाचे तुषार आसमंतातल्या फुलपाखरांवर बरसतात तेव्हा ती फुलपाखरे घाबरून जातात. थव्याथव्यांनी भिरभरणारी ही पिवळी फुलपाखरे त्यांच्यावर जेव्हा हळदुवी उन्हं पडतात तेव्हा रत्नांसारखी दिसतात. आषाढघनाच्या नीलवर्णात वनं, सृष्टी न्हाऊन निघालीय.

★ कृती – ५. रसग्रहण.

या ओळींचे रसग्रहण करा.

रे थांब जरा आषाढघना
बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंचीं हीं शेते
प्रवाळमातीमधलीं औतें
इंद्रनीळ वेळूंचीं बेटें
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध – केतकी
फुटे फुलीं ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा

उत्तर: आषाढ महिन्यातील निसर्गसौंदर्याचे वर्णन करताना कवी बा. भ. बोरकर आपल्या खास शब्दकळा वापरताना दिसतात. आषाढातील मेघ आपल्यासोबत जलधारांच्या राशी घेऊन येतात. या राशींचे सिंचन भूतलावर करताना या घनाने थोडा वेळ थांबून या पृथ्वीकडे, तिच्या रूपाकडे लक्ष दयावे असे कवीला वाटते. ज्या घनांमुळे पृथ्वीलाही सौंदर्यछटा प्राप्त झाली आहे. त्या सृष्टीकडे घनाने दृष्टी टाकावी. तिचे सौंदर्य त्याने न्याहाळावे असे कवीला वाटते म्हणून कवी म्हणतो की, “हे आषाढघना जरा थांब तुझी दिठि भरभरून तुझ्यामुळे साकार झालेली करुणा पहा. “

आजूबाजूला पसरलेल्या हिरव्यागार शेतांचा रंग पाचूसारखा आहे. म्हणून कवी त्याला पाचूची शेते म्हणतो. लाल प्रवाळ मातीमध्ये असलेली शेतीची अवजारेदेखील त्याने पहावयास हवी. या मातीला पोवळ्यासारखा लालसर तांबूस रंग आहे म्हणून त्याला प्रवाळमाती म्हटले आहे. इंद्राच्या कृपा म्हणून तर मेघ, घन पृथ्वीतलावर येतात. त्याच्यामुळे साजिरे झालेले वेळूचे, बांबूचे बेट खूप घनदाट झाले आहे. त्यात घनही त्यावर ओथंबून राहिल्याने तिथेही घनाचे नीलस्वरूप दिसून येत आहे. या सर्वांवर तुझ्या

पदांच्या सुंदर नादमय खुणा पसरलेल्या आहेत.

तुझ्या येण्याने ही केतकीदेखील रोमांचित झाली आहे. सोनचाफादेखील तुझ्या येण्याने सर्व बाजूंनी फुटून बहरून फुलला आहे. जाईच्या वेलीदेखील तुझ्या दर्शनाने लाजून गेल्या आहेत. तुला पाहण्यासाठी या निसर्गातील फुले, वृक्षे आसुसली आहेत. त्यांना तुझ्या कृपाकटाक्षाची आवश्यकता आहे. ह्या कटाक्षाची उदारता तू त्यांना देऊन त्यांना आनंद दे असे कवी आषाढघनाला सांगत आहे.

(आ) ‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर………’ या विषयावर निबंध लिहा.

उत्तर: जून महिन्यानंतर आपणा सर्वांनाच पावसाचे वेध लागतात. वळीवाच्या पावसाने आगमनाची चाहूल आपल्यापर्यंत पोहोचलेली असते आणि त्या वळीवाच्या पावसामुळे आपण जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाची वाट पाहत असतो.

जूनमध्ये पाऊस पडतोच असं नाही. एखादं फुलपाखरू हातात येताना सटकतं ना तसंच या जूनमधील पावसाचं असतं. पण ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाची जोरदार वर्णी लागू लागते. असंख्य धारांनी पृथ्वीला चिंब करण्याचे कर्तव्य तो अखंडपणे बजावत असतो. ऑगस्टमध्ये बरसणारा पाऊस हा आषाढातला पाऊस म्हणून ओळखला जातो. चिंब चिंब भिजणारा हा पाऊस जर पडलाच नाही तर,. ….. ज्येष्ठात पडलेल्या पावसाच्या सिंचनाने हिरवीगार झालेली धरणी करपायला लागेल. पिकांना कोंब फुटून त्याची इवली रोपेवाढायला लागतात. त्यांची वाढ खूंटून ते वाळू लागतील. पावसाच्या पूर्व आगमनामुळे जमिनीच्या आत असलेले झरेही फुटू लागलेले असतात. त्यांच्यात ओलावा तयार झालेला असतो. जर आषाढघना आलाच नाही तर झरेही सुकून जातील. नदयांचेही पाणी सुकून जाईल, गावागावात कोरडा दुष्काळ पडेल. या दुष्काळाच्या झळा फक्त ग्रामीण भागालाच सोसाव्या लागणार नाहीत तर शहरी विभागालाही सोसाव्या लागतील. पाणी पुरवण्याचे नियोजन संपुष्टात येईल. ग्रामीण भागातील शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेतीचे अन्य उद्योग या सर्व उदयोगांची गती थांबेल. पीक न पिकल्याने धनधान्यांची किंमत वाढेल. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे चार महिने पावसाळा ऋतूचे आपण मानतो. कोणत्या एकाच महिन्यात भरपूर पाऊस झाला आणि नंतर कोणत्याही महिन्यात पाऊस झाला नाही तरीही शेतकऱ्यांचे, पिकांचे हालच होणार. त्यामुळे या चारही महिन्यांत पुरेसा पाऊस पडणे आवश्यक आहे.

आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही महाराष्ट्रीयन लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची एकादशी. निसर्गाचा आनंद घेत घेत विठूरायाचे नामस्मरण करत ही वारी वारकरी लोक करत असतात. आषाढघनामुळे ही वारी सुसह्य होत असते. आषाढघन आला नाही तर ह्या वारीचा, विठूरायाच्या नामस्मरणाचा आनंद घेता येणार नाही.

आषाढघनाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप जोरदार सरी या काळात बरसत असतात. विविध फुले या काळात फुलून येत असतात. पूजाअर्चेला ही फुलं वापरली जातात. आषाढघनाच्या न येण्याने या फुलांची सुंदरता, वनांची सुंदरता अनुभवता येणार नाही. ‘आषाढस्य प्रथम दिवसे असं म्हणून कालिदासाचे, त्याच्या मेघदूताचे स्मरण या काळात केलं जातं. आषाढघनाद्वारे कालिदासाने आपल्या प्रेयसीला आपली व्याकुळता कळवली. नितांत प्रेमाचा, विरहाचा हा आदर्श मानला जातो. आषाढ महिन्यातील या दिवसाला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. आषाढघनच जर आले नाहीत तर या दिवसाचा आनंदही लोकांना घेता येणार नाही.

प्र. २. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना
काळोखाचीं पीत आंसवें
पालवींत उमलतां काजवे
करूं दे मज हितगूज त्यांसवें
निरखित जळांतिल विधुवदना.

उत्तर:

‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेत आषाढघनाला जरासे या पृथ्वीवर थांबण्याची विनंती बा. भ. बोरकर करतात. आषाढघनाच्या कृपेमुळे निसर्ग बहरून आला आहे. शेतात पीक जीव धरू लागले आहे. पिकाची वाढ होऊन त्याला कणसं येत आहेत. त्यात कोवळे दाणेतयार होऊ लागले आहेत. त्या दाण्यात दूध भरून तयार आहे. फुलांची विविधता आजूबाजूला फुलली आहे. त्यांच्या देठामध्ये मधुर असा मध साठून राहिला आहे. निसर्गातील मधुरता पक्ष्यांच्या कंठातही उतरली आहे. त्यांच्या गोड गायनाने वातावरण सुरेल झाले आहे. या सर्वच वातावरणाला पाहून तृणपात्यांनाही शहारा आला आहे.

आश्लेषा नक्षत्रामध्ये बरसणाऱ्या तुषाररूपी सरींनी फुलपाखरांचे थवे बावरून जातात. कवी फुलपाखरांकरता पिसोळी हा कोकणी शब्द येथे उपयोजतात. ही फुलपाखरे थव्याथव्यांनी फिरू लागतात. जेव्हा त्यांच्यावर हळदुवी उन्हं पडतात तेव्हा मात्र ती रत्नांसारखी लखलखू लागतात. त्यांचे तेज मनाला मोहीत करते. कवी या करता ‘रत्नकळा’ हा शब्द वापरून फुलपाखरांचे तेज प्रकट करतात.

काळोख पडता पडता तो संपूर्ण प्रकाशाला कवेत घेतो. अनेकांचे अश्रू पित पित काळोख आपलं साम्राज्य पसरवू लागतो. अंधाराला मिटवण्यासाठी काजवे आपल्या इवल्याशा प्रकाशाने आसमंत उजळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालवी पालवीत हा अंधुक पण मोहक प्रकाशही मला (कवीला) भूलवू पाहतो.

कवी परिचय

बा.भ. बोरकर हे गोव्यामधले कवी. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले कवी होते. ३० नोव्हेंबर १९१० मध्ये गोव्यातील कुडचडे येथे त्यांचा जन्म झाला.

१९३० मध्ये ‘प्रतिमा’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. केशवसूत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कवितांचा प्रभाव त्यांच्यावर होता. गोव्यातील कोकणातील निसर्ग हा त्यांच्या कवितेचा प्राण होता. निसर्गातील विविध रूपांना त्यांनी आपल्या कवितेत साकारले. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी अत्यंत संपन्न असून नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष होता. >

गोव्यात काही काळ शिक्षक म्हणून बा. भ. बोरकर कार्यरत होते. यांनी मुंबईच्या ‘विविधवृत्त’ या पत्रात काही काळ काम केले तर ‘आमचा गोमांतक’, ‘पोर्जेचा आवाज’ या पत्रांचे ते संपादक होते. पुणे-गोवा आकाशवाणी केंद्रावर वाङ्मय विभागाचे ते संचालक होते. ‘जीवनसंगीत’, ‘दूधसागर’, ‘आनंदभैरवी’, ‘गितार’, ‘चित्रवाणी’, ‘कांचनसंध्या’ हे त्यांचे अन्य काव्यसंग्रह तसेच त्यांचे ‘कागदी ‘होड्या’, ‘चांदण्याचे कवडसे’, ‘घुमटावरले पारवे’ हे लेखसंग्रह तसेच ‘मावळता चंद्र, ‘प्रियदर्शनी’, ‘भावीण’ इ. ललित साहित्य प्रसिद्ध आहे. महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. ‘सासाय’ या त्यांच्या कोकणी भाषेतल्या कवितासंग्रहाला १९८१ चा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ लाभला. १९६७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. गोवामुक्ती आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. त्याकरता त्यांना ‘ताम्रपट’ हा सन्मान दिला गेला.

कांदबरीकार, ललित लेखक, कथाकार, चरित्रकार म्हणूनही त्यांचे नाव साहित्यांत आदराने घेतले जाते. काव्यक्षेत्रात त्यांची ‘आनंदयात्री’ कवी म्हणून दखल घेतली जाते. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत.

शब्दार्थ

किमया – जादू (magic ), देठ – ( a pedicel, stem), कंठ गळा (throat), तृण गवत (grass), काळोख – अंधार (darkness), प्रवाळ – पोवळे (coral), हितगूज (an intimate), दिठि -दृष्टी, नजर (sight), जिवस -पौष्टिक (nutritious), अरळ -अलवार,इंद्रनीळ – निळ्या रंगाचे एक रत्न (sapphire), पिसोळी -फुलपाखरू (butterfly), पदविन्यासखुणा – पाऊलखुणा (footprints), आसर पावसाळ्यातील उघडीप, वासरमणि – सूर्य (the sun), हळदुव्या हळदीच्या रंगाचे (yellowish), विधुवदना – चंद्रबिंबाला

कवितेचा आशय:


‘रे थांब जरा आषाढघनाबा.’ या निसर्ग कवितेतून कवी
भ. बोरकर आषाढघनालाच थांबण्याची विनंती करतात. आषाढसरींनी तृप्त झालेली धरणी पूर्णतः फुलून गेली आहे. आपणच जन्म घातलेल्या तान्हुल्याच्या नाना कळा पाहण्यात पालक आनंद मानतात तसाच आनंद आषाढघनाला मिळावा असे कवी. बा. भ. बोरकर यांना वाटते. म्हणून ते आषाढघनाला या निसर्गाचे विभ्रम पाहण्यासाठी विनंती करतात, त्यासाठी निसर्गातील विविध घटकांचे वर्णन करताना त्याला मानवी भावनांचा स्पर्शदेखील ते करतात. कवितेचे सौंदर्य खुलावे याकरता संस्कृत तर कधी मालवणी बोलीभाषेतील शब्दप्रयोग त्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे कवितेची नजाकत वाढलेली दिसते.

रे थांब जरा……………………….
……………………….भरुन तुझी करुणा

आषाढघनाला ते विनंती करतात की हे आषाढघना तू केलेली करुणा तुझ्याच नजरेत साठवून घे. तुझ्या कृपेची सावली या सृष्टीवर झाल्याने हा निसर्ग बहरून गेला आहे. शेतांमध्ये पेरलेली बी-बियाणे आता छान उगवली आहेत. त्यांची रोपे वाढत आहेत.

कोमल पाचूंचीं हीं ……………………………
……………………..तुझ्याच पदविन्यासखुणा

त्यांचा पोपटी हिरवा रंग पाचूचीच आठवण करून देतो. पोवळ्यासारखा तांबूसलाल मातीचा रंग मनाला विलक्षण वेधून घेणारा आहे. त्यामधील शेतीला लागणारी अवजारे |देखील देखणी दिसत आहेत. कोकण, गोवा प्रांतात वेळूचे बन असते. त्याचा रंग हिरवट जांभळा असा असतो. या वेळूच्या बेटांमध्येही आषाढघन साठून राहिलेले असतात. त्यामुळे त्याला इंद्रनील स्वरूप प्राप्त झालेले असते. या सर्वच आषाढघनाच्याच नादाच्या, तालाच्या पाऊलखुणा आहेत. या पाऊलखुणांवर त्याने रेंगाळावे असे कवीला वाटते.

रोमांचित ही गंध-केतकी…………………………
………………………..तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा

निसर्गरम्य झालेले वातावरण फुलांच्या सुगंधामुळे सुगंधितही झाले आहे. केतकीची फुले रानावनात फुलली आहेत. सोनचाफ्यालाही बहर आला आहे. अनेक फुलं फुटून फुलून येत आहेत. तुला पाहून जाईच्या लेकी, कळ्याही लाजत आहेत. तुला पाहण्याचे धाडस त्या करू पाहतात पण ते धाडस त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे तुला त्या चोरून पाहत आहेत.

उघड गगन, कर घडिभर…………………….
………………………….कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा

आषाढघना या भूतलावर तू येतोस तसाच ये बरं. तुझे गगन उघड. घडीभर तू इथे विश्रांती घे तुझे वासरमणि म्हणजे प्रकाश किरण या भूमीवर पडू देत. तुझी हळदुवी पिवळी उन्हंही या धरणीवर येऊ देत. त्यामुळे तुझीच एक वेगळी किमया आम्हालाही अनुभवता येते.

भरूं दे जिवस दुधानें……………………….
………………………….आणीत शहारा तृणपर्णां

ऊन, पावसाच्या या किमयेमुळे शेतातील रोपाला कणसं धरू लागतील. त्या कोवळ्या दाण्यांमध्ये दूध साठलेलं आहे. हा मध फुलांच्या देठापर्यंत साठलेला आहे. हे सर्व पाहून आनंदित झालेले पक्षी आपल्या गायनाने सर्वांना खुश करत आहेत. या सर्वच मधुर, रम्य वातावरणाला पाहून गवतपात्यांना शहारा आलेला आहे.

आश्लेषांच्या तुषारस्नानीं………………………
………………………… न्हाणोत इंद्रवर्णांत वना

आषाढ महिन्यात आश्लेषा नक्षत्रं येतं. आश्लेषाचे तुषारआसमंतातल्या फुलपाखरांवर बरसतात तेव्हा ती फुलपाखरे घाबरून जातात. थव्याथव्यांनी भिरभरणारी ही पिवळी फुलपाखरे त्यांच्यावर जेव्हा हळदुवी उन्हं पडतात तेव्हा रत्नांसारखी दिसतात. आषाढघनाच्या नीलवर्णात वनं, सृष्टी न्हाऊन निघालीय.

काळोखाचीं पीत आंसवें………………………
…………………….. निरखीत जळांतिल विधुवदना

अंधार दाटत असताना अनेकांच्या मनातील काळोखही पचवता पचवता तुझं येणं त्यांच्यासाठी लाभदायीच असतं. काळोखाची आसवं पित पित रात्रीच्या मिट्ट काळोखात पालवी पालवीतून काजवे उमलू लागतात. त्या काजव्यांसमवेत मला हितगुज करायचे आहे. त्याचबरोबर पाण्यात चंद्र – चांदण्यांचे पडलेले प्रतिबिंब पाहत रात्रीच्या सौंदर्याचा मला आनंद घ्यायचा आहे. या सर्व सौंदर्याचा तू निर्माता आहेस त्यामुळे तू ही या सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरता थोडावेळ रमावेस, थांबावेस असे वाटते.

Leave a Comment