Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter Solutions अहवाल (Ahval Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter अहवाल
12th Marathi Guide Prashn uttar Chapter अहवाल Textbook Questions and Answers.
★कृती
★कृती- १.अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर: शालेय, महाविदयालयीन जीवनात वेगवेगळे समारंभ, कार्यक्रम, क्रीडास्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या कार्यक्रमांचे, समारंभांचे अहवाल लिहून लिखित नोंद ठेवली जाते. असे अहवाल भविष्यकाळामध्ये उपयुक्त ठरतात. अहवालामुळे कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील समजण्यास मदत होते.
एखादया कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. ही नोंद करत असताना त्यामध्ये कार्यक्रमाचे प्रयोजन, दिनांक, वेळ, सहभाग घेतलेल्या व्यक्ती, कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि कार्यक्रमाचा समारोप अशा अनेकविध मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. कार्यक्रम अथवा समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून अखेर कार्यक्रम संपेपर्यंतच्या घटना, प्रसंगानुरूप क्रमवारीने कार्यक्रम पूर्णत्वास कसा गेला याची आवश्यक तेवढ्या तपशीलासह लेखी नोंद अहवालामध्ये केली जाते. एखादया विषयासंदर्भातील समस्येच्या संबंधाने माहितीचे संकलन, सर्वेक्षण, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात. तसेच प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक सहामाही अहवाल असे अनेक प्रकारचे अहवाल असतात. असे अहवाल नजिकच्या काळासाठी उपयुक्त ठरतात. योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार केले जातात.
★ कृती – २. अहवालाची आवश्यकता लिहा.
(मार्च, २०२२)
उत्तरः आधुनिक काळामध्ये मानवाच्या गरजेचे स्वरूप बदलत असल्याचे दिसते. व्यावहारिक व्याप वाढल्यामुळे माहितीचे संक्रमण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक असते. अहवालाचे स्वरूप कार्यक्रम, समारंभ, विविध स्पर्धा यांवरून बदलते. असे असले तरी कामकाज संदर्भातील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी अहवाल उपयोगी पडतात. भविष्यकाळात भूतकालीन घटना पडताळून पाहण्यासाठी अगोदरच्या काळात झालेले कार्यक्रम, समारंभ, मिटिंग, स्पर्धा, इतर अनाहूत घडलेल्या घटना, प्रसंग इत्यादीची माहिती अहवालाद्वारे मिळते. त्यामुळे संस्थेचा इतिहास, परंपरा यांची ओळख होते. अहवाल स्वरूपातील लिखित दस्तऐवजाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर लिखित नोंदी नसतील तर संस्थेची, शाखेची माहिती मिळवण्यात अडचणी येतील. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते. हे अहवाल भविष्यकालीन नियोजनासाठी आवश्यक असतात.
विविध संस्था, लहान मोठ्या व्यवसाय समूहासाठी आणि त्याच बरोबर ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त होण्यासाठी अहवाल उपयुक्त ठरतात. अहवालामध्ये एखाद्या विशिष्ट घटना, प्रसंगासंबंधी किंवा समस्या निवारण करण्यासाठी एकत्रित माहिती जमा केली जाते. त्याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम राबवायचा असेल तर त्या अगोदर योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. अहवाल हा एकत्रित व सुसंबद्ध माहिती देणारे एकमेव साधन असल्याने निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. भविष्यकालीन धोरणे निश्चित करता येऊ शकतात. अहवालामधील माहिती ही कायमस्वरूपी असल्याने बाह्य जगाशी संपर्क साधता येऊन नवनवीन माहिती उपलब्ध होऊ शकते.
या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे अहवाल लेखनाची आवश्यकता व्यापार, उद्योगव्यवसाय, शाळा, महाविदयालये, सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक, राजकीय सर्व क्षेत्रांत असल्याचे दिसते.
★कृती -३. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर: अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठ नोंदीच्या स्वरूपात असते. अहवालाचा विषय, प्रकार कोणताही असो, त्या विशिष्ट अशा नोंदींमुळे अहवालास एक प्रकारची विश्वसनीयता प्राप्त होते. नि:पक्षपातीपणे प्रत्येक घटनेची नोंद अहवालात आवश्यक असते. जे घडले, जसे घडले, जे अनुभव आले त्यांच्या नोंदींवरून अहवाल लेखन केले जाते. त्या समारंभात, सभेत, नवीन उपक्रमात, संशोधनकार्यात जे अनुभवले, पाहिले, ऐकले याबाबतची खरी, वास्तव अशी माहिती अहवालात आपल्या समोर येत असते. म्हणूनच वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटले जाते.
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झालेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप’ समारंभाचा अहवाल तुम्हांला लिहावयाचा आहे. या अहवालात समारोप समारंभाच्या माहितीबरोबरच मराठी भाषा संवर्धनासाठी राबवलेले विविध उपक्रम हा ही भाग महत्त्वाचा आहे. विदयार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया व त्यांचे भाष्यही अपेक्षित आहे. जे नानाविध उपक्रम घेण्यात आले त्यातून काय निष्पन्न झाले. त्याचे फलित कशाप्रकारे मिळाले हेही अहवालात सांगणे अपेक्षित आहे. थोडक्यात जे घडले त्या वास्तवाचे प्रतिबिंब अहवाल असते. म्हणूनच वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे अस म्हटले जाते.
कृती- ४. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा.
(सप्टें., २०२१; मार्च, २०२२)
★(१) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता
★(२) शब्दमर्यादा
★(३) नि:पक्षपातीपणा
(४) विश्वसनीययता
(५) सोपेपणा
(६) विविध क्षेत्रातील गरज
उत्तर: जनजीवनात विविध पातळीवर आपले व्यवहार आणि कार्ये अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अहवाल लेखन केले जाते. हे लेखन शालेय महाविद्यालयीन तसेच राजकीय, सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ पार पडल्यानंतर काळजीपूर्वक, पूर्ण कार्यक्षमतेने तपास करून त्याविषयी माहिती गठित करून केले जाते त्यास अहवाल लेखन असे म्हणतात.
(१) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता : अहवालाच्या स्वरूपानुसार वास्तव स्थितीचे दर्शन होईल असे लेखन जाणीवपूर्वक करावे लागते. त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी खात्रीने, ठामपणे केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णतः सुस्पष्ट असतात. मुद्द्यांची मांडणी करताना क्रमबद्धता असणे गरजेचे असते. अहवाल सरळ, लांबलचक न लिहिता मुद्देसूद असायला हवा.
(२) शब्दमर्यादा: अहवाल हा आटोपशीर असावा. अहवालाचा विषय / स्वरूप यांवर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. अहवालावरून सहजपणे त्याचे निष्कर्ष काढता येण्यासाठी गरजेनुसार असेल तीच माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडणे हे महत्त्वाचे ठरते. सांस्कृतिक, साहित्यिक, सार्वजनिक क्षेत्रांतील अहवालाच्या तुलनेने सहकारी संस्थांच्या, वार्षिक सर्वसाधारण सभांच्या अहवालाची व्याप्ती अधिक असते. नवीन उपक्रम अथवा गुंतागुंतीच्या समस्यांच्या संदर्भातील संशोधनात्मक अहवाल किंवा सार्वजनिक क्षेत्रांतील उदयोग व्यवसाय, सार्वजनिक सेवा (उदा. बस, वाहतुक, रेल्वे, पोस्ट) यांच्या संदर्भातील अहवाल सविस्तर लिहिले जातात. त्यात माहितीचा खजाना, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखादया कार्यक्रम अथवा समारंभाचा अहवाल तीन-चार पानांचा असतो. तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पानांचाही असू शकतो.
(३) नि:पक्षपातीपणाः अहवालाचा विषय अथवा प्रकार कोणताही असला तरी तटस्थपणे योग्य मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक असते. नि:पक्षपातीपणा हे अहवालाचे सामाईक वैशिष्ट्य आहे. अहवाल हा एकांगी, एककल्ली होणार नाही याची काळजी अहवाल लेखकाने घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे स्वइच्छेप्रमाणे त्याला लेखन करता येणार नाही. लेखकाने लेखनामध्ये विषयाला बाधा येईल. त्यातून अनर्थ घडेल अशी प्रक्षोभक विधाने देऊ नयेत तरच ते लेखन निर्दोष होऊ शकेल.
वरील गुणवैशिष्ट्ये नजरेसमोर ठेवून अहवाल लेखन केले पाहिजे.
(४) विश्वसनीयताः
अहवालातील अचूक माहितीमुळे आणि तथ्यांच्या नोंदीद्वारे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अहवालाचा उपयोग पुरावा म्हणून केला जातो. हे अहवालाचे खास असे वेगळेपण असते.
(५) सोपेपणाः
अहवालातील भाषा सोपी असावी. अहवालातील आशय सर्वसामान्य व्यक्तीला समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून अहवालाचे लेखन केले जाते. अहवालाचा अर्थ सहजासहजी समजेल अशी भाषा असते. नाट्यपूर्णता आलंकारिक वर्णनशैली, अतिशयोक्ती किंवा साहित्यिक रचनेच्या गोष्टी अहवालात टाळल्या जातात. परंतु अहवाल क्षेत्राशी संबंधित संज्ञा, एक्रिया यांविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात. तांत्रिक आणि बोजड शब्द फारसे वापरले जात नाहीत.
(६) विविध क्षेत्रातील गरज: शाळा-महाविदयालयांमध्ये क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलने, वक्तृत्वस्पर्धा असे अनेक कार्यक्रम संपन्न होतात. तसेच शासकीय, आर्थिक, सामाजिक संस्थांचेसुद्धा कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांनंतर त्यांचे अहवाल लेखन केले जाते. माहितीचे शिस्तबद्ध जतन करण्यासाठी अहवालाची उपयुक्तता आहे. भविष्यकाळात संस्थेचा इतिहास, परंपरा इ. माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम, समारंभ, विशेष उपक्रम यांच्या लिखित नोंदी अद्ययावत असणे आवश्यक असते. भविष्यकालीन तरतुदीसाठी या बाबी अत्यंत आवश्यक असतात. बाह्य जगाशी संपर्क साधण्यासाठी उदा. लहानमोठे उद्योगधंदे, विविध संस्था आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची आवश्यकता असते. एखादया समस्येचे निराकरण करून अचूक निर्णय घेण्यासाठी अहवालाची अत्यंत गरज असते. प्रकल्प अथवा सार्वजनिक क्षेत्रांत महत्त्वाकांक्षी उदयोग अथवा उपक्रम नव्याने सुरू करण्यासाठी त्या संदर्भातील योग्य माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते.
★कृती- ५. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी
सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: एखाद्या कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद अहवाल रूपात केली जाते. अहवाल हे त्या-त्या संस्थेतील कार्यक्रमाचे महत्त्वाचे असे लेखी स्वरुपातले दस्तऐवज असतात. अहवाल लेखन करताना संबंधित विषयाच्या स्वरूपाची योग्य जाणीव, वास्तवदर्शी लेखन स्वरूप, सहज स्वाभाविक अशी भाषाशैली, योग्य असा सारांश करायची वा संक्षिप्त लेखन कला अशा अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत.
अहवाल लेखन करताना संबंधित विषयाची योग्य अशी जाण अहवाल लेखकाला असणे महत्त्वाचे आहे. उदा.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ सारखा उपक्रम घेतला असेल तर आपली मातृभाषा, तिचे महत्त्व यांबद्दल योग्य जाण असावी. आपल्या भाषेचे संवर्धन मी, तुम्ही नाही तर आपण सर्वांनी केले पाहिजे याबाबतची आवश्यकता अहवालात नेमक्या पद्धतीने मांडण्यासाठी विषयाचे महत्त्व अहवाल लेखकास समजलेले असणे आवश्यक आहे. भाषासंवर्धनाची जबाबदारी व त्यासाठीची कर्तव्ये ही आपलीच आहेत हे स्वभाविकपणे अहवालात मांडणे आवश्यक आहे.
‘पारितोषिक वितरण समारंभ’ अहवाल लेखन करताना सारांश लेखन करण्याची कला महत्त्वाची आहे. कार्यक्रमाचा तपशील देताना प्रमुख पाहुण्यांचे मनोगत महत्त्वाचे आहे. प्रमुख पाहुणे तासभर बोलेले असतील तर त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अहवालात असलेच पाहिजेत. उदा. ‘स्पर्धायुक्त जगात निभाव लागण्यासाठी तुमच्याकडे परीक्षेतल्या गुणांबरोबरच इतरही क्षेत्रांतील प्राविण्य असले पाहिजे. संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संवेदनशीलता यांबरोबरच प्रबळ अशा आत्मविश्वासाची आवश्यकता आहे.’ यावर प्रमुख पाहुण्यांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने जोर दिला. संक्षिप्त लेखनकला अहवाल लेखनासाठी खूप आवश्यक आहे.
★ कृती -६. खालील विषयांवर अहवालाचे लेखन करा.
(अ) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे, नवजीवन कनिष्ठ महाविद्यालय ठाणे, जिल्हा ठाणे.
स्नेहसंमेलन
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ अहवाल
बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ४.३० वाजता महाविदयालयाच्या भव्य प्रांगणात सन २०२१२०२२ या शैक्षणिक वर्षाचा स्नेहसंमेलन समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
समारंभाचे अध्यक्षस्थान श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. दादासाहेब आवाडे यांनी भूषवले
होते. उस्मानाबाद येथील साहित्यिक मा. यशवंतराव चौधरी हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभात श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कनिष्ठ महाविदयालयाचे सर्व पदाधिकारी, सर्व अध्यापक, निमंत्रित नागरिक, प्रतिष्ठित मंडळी आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “
समारंभाच्या प्रारंभी प्रा. मधुसूदन अष्टेकर यांनी प्रास्तविक केले. प्रास्ताविकामध्ये महाविदयालयाची जडणघडण, राबवत असलेले उपक्रम, शैक्षणिक घौडदौड स्पष्ट करत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यानंतर प्रा. प्रज्ञा शिंदे यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले. स्वागतगीताने बारावीतील वाणिज्यशाखेच्या विदयार्थ्यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी सूरमयी स्वागत केले. स्वागत गीतानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या हृदयस्पर्शी सत्कारानंतर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. नी. एस. मुजुमदार यांनी धावता आढावा घेताना महाविदयालयाची परंपरा, कालानुरूप शिक्षणपद्धतीमध्ये स्वीकारलेले बदल, नवनवीन उपक्रमांची माहिती देताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेंटर, सी. ए., सी. एस. विशेष अध्यापन वर्ग, नेट, जेईई. एन. डी. ए. परीक्षा मार्गदर्शन वर्ग यांबद्दलचा उपक्रम वृत्तांत सादर केला. यावेळी त्यांनी कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक आणि विदयार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतला. तसेच माजी विदयार्थी १९७० च्या बॅचचे माजी
शिवाजी लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सत्तरच्या दशकातील आठवणींना उजाळा देत महाविदयालयातील अध्यापकांचे ऋण व्यक्त करत सर्वांगीण श्रमसाफल्याचा आनंद आयुष्यात उपभोगता आल्याचे व्यक्त केले.
सभारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक मा. यशवंतराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, आजी विदयार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा अव्याहत चालू ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी कटीबद्ध रहा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. श्री. दादासाहेब आवाडे यांनी आपल्या आयुष्याचा जीवनपट मांडला.
त्यानंतर ते म्हणाले, ‘प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे गेल्यास जीवन सार्थकी लागते. आपल्यातील न्यूनत्वावर मात करा. नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारा प्रत्येक दिवस वेगळेपणाने जगा, ‘स्व’ चा शोध घेवून आत्मसामर्थ्याने उत्तुंग यश गाठा’. असा दिव्य संदेश देत अध्यक्षीय भाषणास पूर्णविराम दिला.
समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. मानवी जगसोळ, प्रा. राहूल पवार यांनी केले. माजी विदयार्थी स्नेहसंमेलन समितीचे चेअरमन प्रा. विकास पाटील व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. आभारप्रदर्शन वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. तुषार जाधव यांनी केले. तीन तास रंगलेल्या या समारंभाची सांगता सायंकाळी ७.३० वाजता झाली.
सचिव अध्यक्ष
(आ) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम
अहवाल लेखन.
सर्वोदय शिक्षण संस्थेचे,
नरसिंह माध्यमिक आणि कला, वाणिज्य, विज्ञान उच्च
माध्यमिक विद्यालय, शिवगणे, जिल्हा कोल्हापूर.
वृक्षारोपण समारंभ
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ अहवाल
शुक्रवार, दिनांक २० जून २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता विद्यालय आणि गावातील मोकळ्या जागी, रस्त्याच्या दोन्ही तरफांना (कडांना) विदयार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांच्या समवेत वृक्षारोपण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार मा. श्री. आर. एन. पाटील यांनी भूषवले होते. पुणे येथे पोलिस दलात कार्यरत असणारे मा. पी. एस. जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ या विषयावर अध्यक्ष आणि पाहुणे यांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमामध्ये अनेक | वनौषधी, पर्यावरणासाठी पूरक ठरणाऱ्या अनेक रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण करण्यासाठी सर्वोदय | शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार, इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर सरपंच, पोलिस पाटील, खेडूत, स्त्री-पुरुष, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एस. पाटील, विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक बंधू-भगिनी, निमंत्रित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. के. पाटील यांनी केले. त्यांनी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या रूपरेषेचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर प्रा. सुमती देशपांडे यांनी उपस्थितांचे सहर्ष | स्वागत केले. इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागतगीतांच्या माध्यमातून सुरेल स्वागत केले. स्वागतगीतानंतर मान्यवरांच्या हस्ते आमदार मा. श्री. एन पाटील व मा. पी. एस. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या हृदय सत्कारानंतर माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एस. पी. पाटील यांनी शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२२ या वर्षातील विदयालयाने राबवलेल्या उपक्रमांविषयी आढावा घेताना शैक्षणिक कला, जनजागृती, साक्षरता, ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्यविषयक शिबिर इ. विषयीच्या घडामोडींचा वृत्तांत सादर केला. त्याचबरोबर त्यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करणारे ग्रामस्थ, सरपंच, माध्यमिक विद्यालयातील | अध्यापक व विदयार्थ्यांचा सहभाग यांची नोंद प्रकर्षाने केली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. पी. एस. जाधव यांनी ‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ या विषयावर बोलताना ‘सती सावित्री’, ‘वटपौर्णिमासारखे’ पौराणिक दाखले दिले. संत तुकारामांनी वृक्षवेलींचा सखा म्हणून केलेला उल्लेख यथोचित कसा आहे. हे त्यांनी अनेकविध उदाहरणांनी स्पष्ट केले.
‘जागतिकीकरणाने माणसांच्या वृत्तीत झालेले बदल विध्वसंक आहेत तसेच ‘जंगलाला लावण्यात आलेले वणवे’ यावरील स्पष्ट मत मांडले. योग्य वेळी आपण सावध झालो नाही तर अनिश्चित वातावरणास सामोरे जावे लागेल. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड, जंगलांची वाढ होणे आणि पावसाच्या पाण्याची उपलब्धता वाढणे’ यावर त्यांनी विचार मंथन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. आमदार श्री. आर. एन. पाटील यांनी ‘वृक्षांचे महत्त्व’ यावर बोलताना ‘प्रत्येक नागरिकाने नैतिक जबाबदारी ओळखून जाणीवपूर्वक वृक्षलागवड करावी, त्यांची देखभाल करावी. आपले व इतरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पर्यावरणपूरक रोपांची लागवड करून जीवन सुसंपन्न करावे’ असे सांगून अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदयार्थी प्रतिनिधी गायत्री माने आणि विशाल देशमुख यांनी केले. तसेच वृक्षारोपण करताना आवश्यक साधनसामग्री सुविधा विद्यालयाचे सेवक श्री. धनंजय जाधव, श्री दत्तात्रय बंडगार इत्यादींनी पुरविली. आभार प्रदर्शन हिंदी विभागाचे प्रा. डी. एस. माने यांनी केले. दोन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता सकाळी साडे-दहा वाजता झाली.
दि. २५ जून २०२१. सचिव अध्यक्ष
कृतिपत्रिका
प्र. १. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.
(अ) खालील चौकट पूर्ण करा.
(१) अहवाल लेखन म्हणजे-
उत्तर: एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभांची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय.
(आ) अहवाल नोंद करताना आवश्यक ठरणारे महत्त्वाचे मुद्दे :
(१). (२). (३) . (४) .
उत्तर: (१) कार्यक्रमाचा हेतू
(२) कार्यक्रमाची तारीख
(३)कार्यक्रमातील सहभागी व्यक्ती
(४) कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद
स्वरुप : एखादया कार्यालयात, संस्थेत•••••••••••••••••
आवश्यकता:
अहवाल तयार करणे आवश्यक असते. (पाठ्यपुस्तक पृ. क्र. १००)
(इ) कारणे लिहा.
★एखादया संस्थेसाठी अहवाल लिहिणे अत्यंत आवश्यक आहे, कारण °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
उत्तर: एखादया संस्थेसाठी अहवाल लिहिणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जर संस्थेच्या कार्यक्रमात समारंभाच्या नोंदी अहवालाच्या माध्यमातून ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवण्यात अडचणी येतात.
(ई)अहवालाची आवश्यकता असणारी क्षेत्रे –
(१). (२).
उत्तर:
(१) विविध संस्था, लघुउद्योग ते मोठेमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवाल गरजेचे असतात.
(२) सार्वजनिक क्षेत्रांत एखादा उद्योग वा उपक्रम सुरू करायचा असेल तर त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे आहे.
(ऊ) अहवालाचे चार प्रकार लिहा.
(१)…………
(३)…………
(२)…………
(४)………..
उत्तर: (१) प्रगती अहवाल (२) मासिक अहवाल
(३)चौकशी अहवाल (४) आढावा अहवाल
प्र. २. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाचे महत्त्व स्पष्ट
करा.
( अहवाल लेखनाचे स्वरूप, अहवाल लेखनाचे प्रकार, अहवाल लेखनाची क्षेत्रे, अहवाल लेखनाची आवश्यकता)
उत्तरः वेगवेगळ्या संस्थांमध्ये, कार्यालयांमध्ये वर्धापन दिन, तर कधी खास कार्यक्रमांचं आयोजन, कधी मान्यवरांना आमंत्रित करून व्याख्यानमाला आयोजित करणे, विविध स्पर्धा घेणे, विविध दिन विशेष साजरे करणे इत्यादी. या सगळ्या कार्यक्रमाच्या नोंदी अहवालाच्या स्वरूपात जतन करून ठेवणे हे गरजेचे असते. त्यामुळे भविष्यात संस्थेची प्रगती, तिचा इतिहास समजून घेताना मदत होते. या नोंदी करताना तारीख, वेळ, कार्यक्रमाचा हेतू, सहभागी व्यक्ती, समारोप या सगळ्यांचा उल्लेख करणे गरजेचे असते.
काही वेळा विशिष्ट समस्यांचे निराकारण करण्यासाठी त्या समस्येशी संबंधित माहिती गोळा करून, त्यावर अहवाल लिहावा लागतो. त्या अहवालावर आधारित उपाययोजना करणे हे सोयीचे ठरते. सार्वजनिक क्षेत्रात एखादा उद्योग किंवा उपक्रम सुरू करताना असे अहवाल तयार करणे फार गरजेचे असते. याशिवाय विविध संस्था, लघुउद्योग, मोठे उद्योग, ग्रामपंचायत, महानगरपालिका या ठिकाणी घडामोडी होत असतात. त्याविषयी जर अहवाल लेखन केले असेल तर त्या माहितीला अधिकृतता प्राप्त होते. अहवालाचे विविध प्रकार आहेत.
उदा: (१) प्रगती अहवाल : जो पालकांना दिला जातो, ज्याने विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मापन होते.
(२) तपासणी अहवाल : म्हणजे एखादया घटनेची तपासणी करून, त्यातील बारीक-सारीक गोष्टी नोंदवल्या जातात.
(३) मासिक अहवाल: यात एखादया कार्यालयाच्या महिन्याभरातील घडामोडींचा अहवाल घेतला जातो.
(४) वार्षिक अहवाल : यात वर्षभरातील घडामोडींचा इतिहास नोंदवला जातो.
(५) आढावा अहवाल: यात एखादया संस्थेच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेतला जातो.
थोडक्यात विविध संस्थांसाठी अहवाल लेखन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
°°°°°°°°°°°°°°°°
{अहवाल: नमुने}
°°°°°°°°°°°°°°°°°
(१) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा
दिन कार्यक्रमाचे अहवाल लेखन करा.
गोखले कनिष्ठ विद्यालय रत्नागिरी
* वाचन प्रेरणा दिन *
शैक्षणिक वर्ष अहवाल.२०२१- २२
भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर, महविदयालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून |साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सांगले सर यांनी केले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे प्राचार्यांनी स्वागत | केले. डॉ. कलाम यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाचा आरंभ झाला. प्रास्तविकात डॉ. सांगले सरांनी या प्रकारच्या विशेष उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट | केली. आजच्या टि.व्ही, स्मार्टफोन, टॅबलेट कॉम्प्युटरच्या |जमान्यात विदयार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने वाचन प्रेरणा दिन महाविदयालयात संपन्न होत आहे. पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर वाचन प्रत्येक विद्यार्थ्यांने करावे, अवांतर वाचनामुळे वेगवेगळे संदर्भ, माहिती विदयार्थ्यांना मिळते. आकलनशक्ती वाढते. चांगले बोलता व लिहिता येते. म्हणून सर्वांनी वाचलेच पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ चे महत्त्व समजून घेतले पाहिजे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. डॉ. कलाम यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विदयार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. अविनाश जाधव सरांनी यावेळी सभागृहातील डिजिटल बोर्डवर डॉ. कलाम यांचा जीवनपट विदयार्थ्यासमोर मांडला. यावेळी सभागृहातील डिजीटल बोर्डवर डॉ. कलाम यांनी लिहिलेली विविध पुस्तके व त्या पुस्तकातील मनावर बिंबवणारी वाक्ये सर्वांना वाचून दाखविण्यात आली.
महविदयालयातील ज्येष्ठ प्रा. खानविलकर मॅडम यांनीआपल्या मनोगतात डॉ. कलाम व युवापिढी यांच्यातील नातेसंबंधावर प्रकाश टाकला. दुर्दम्य इच्छाशक्ती, कणखर मन व प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर युवापिढी खूप काही करू शकते. भारताला महासत्ता बनवण्यासाठी युवकांची शक्तीच महत्त्वाची आहे. डॉ. कलाम यांच्या विचाराने व कर्तृत्वाने प्रत्येक युवकाने प्रेरणा घेतली पाहिजे. डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांतून भारताची खरी शक्ती युवाशक्तीच आहे ही बाब अधोरखित केलेली आहे.
महाविदयालयातील प्रा. अशोक कडलग यांनी वाचन प्रेरणा दिन निमित्ताने महाविदयालयात सुरू करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना सांगितली. महाविद्यालयात डॉ. कलाम नावाने एक वाचन कट्टा सुरू करण्यात येणार आहे. विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यांबरोबरच विदयार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी विविध पुस्तके तिथेच वाचनासाठी उपलब्ध असतील. महाविदयालयातील सर्व विदयार्थ्यांनी दिवसातील किमान एक तास तरी वाचनासाठी. दयावा. या वाचनकट्ट्यावर यावे. जे आवडेल ते वाचावे. प्रत्येक विदयार्थ्याने डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे. ‘एक व्यक्ती एक पुस्तक’ उपलब्ध करून देण्याचा आपल्या महविदयालयाचा मानस आहे. ‘वाचू आनंदे’ सारखी एखादी तासिका वेळापत्रकात शक्य आहे का याबाबत आमचा विचार – विनिमय सुरू आहे.
संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनंतराव दीक्षित यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विदयार्थ्यांमध्येच नाही तर प्रत्येक माणसामध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. वाचन संस्कृतीला प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. पुस्तके ही आपल्या ज्ञानात नेहमीच भर टाकत असतात. महाविदयालयात सातत्यपूर्ण प्रयोगातून वाचन संस्कृतीचा विकास सहज शक्य आहे’ यावर त्यांनी विशेष जोर दिला. यासाठी वर्षभर विविध व्याख्याने, अभिवाचन, चर्चासत्रे, कार्यशाळा, ‘पुस्तके आपल्या भेटीला’ म्हणून पुस्तकप्रदर्शने आयोजित केली पाहिजेत. महाविदयालयात चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्र आयोजित करावे, वर्गातील विदयार्थ्यांच्या गटात आवडलेल्या पुस्तकाबाबत साप्ताहिक एक दिवस चर्चा व्हावी यांसारख्या विविध बाबींची आवश्यकता प्रतिपादित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी राजगुरु व आदित्य देशमुख यांनी केले. सूत्रसंचालकाने ‘प्रत्येकाला चल तर आपण सारे वाचन कट्ट्यावर जाऊया’, ‘पुस्तकाशी नातं जोडूया’ असे आवाहन केले. ‘वाचन प्रेरणा दिन’ उपक्रम कार्यक्रमाची ५ वाजता सांगता झाली.
दि.२०/१०/२०२१ अध्यक्ष विद्यार्थी मंडळ
(२) नमुना- ०२
मा. मुख्याधिकारी आपत्ती नियंत्रण
व व्यवस्थापन कक्ष
मंत्रालय, मुंबई. अहवाल
विषय : कोरोनो विषाणूबाबात प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्यवाहीचा अहमदनगर जिल्हा प्रशासन, नियंत्रण कक्ष, दैनंदिन अहवाल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. केंद्र सरकार व राज्यशासन यांचेकडून वेळोवेळी प्राप्त झालेले आदेश व सूचनांची अमंलबजावणी अहमदनगर जिल्हा प्रशासन करीत आहे. अहमदनगर शहर जिल्ह्यातील तालुके व तालुक्यातील गावस्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना आरोग्य अधिकारी, पोलिस यंत्रणा, महसूल विभाग व सर्व ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केल्या जात आहेत. त्यासंदर्भातील दैनंदिन अहवाल.
(१) कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय देशमुख हे ‘कोवीड- १९’ चे कक्ष अधिकारी म्हणून कामकाज पाहात आहेत.
(२) जिल्हा शासकीय शासकीय रुग्णालय, अहमदनगरमध्ये कोरोनाच्या स्वतंत्र कक्षात कोरोना बाधित रुग्ण जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. विश्वास वाघमारे व त्यांचे सहाय्यक डॉक्टर यांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार घेत आहेत. पैकी एका रुग्णाचा त्रास हळूहळू कमी होत आहे.
(३) दुबई, इटली व अमेरिकेतून नगरमध्ये आलेल्या होम क्वारंटाईन असलेल्या संशयित सात व्यक्तींचे रक्तासह घशातील रक्ताचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अदयाप अहवाल येणे बाकी आहे. अहवाल हाती आल्यावर योग्य खबरदारी घेतली जाईल.
(४) होम क्वारंटाईन व्यक्तींचा संपर्क इतरांशी येऊ नये
म्हणून पोलिस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.
(५) संपूर्ण लॉकडाऊनच्या संचारबंदी – काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करून गप्पा मारणाऱ्या ४३० लोकांवर जिल्ह्यात योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. प्रशासनाने निर्देशित केलेल्या सूचनांबाबत अवज्ञा केल्यास ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७’ अन्वये, ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा’ २००५, अन्वये योग्य कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस प्रशासन कार्यालयाला निर्गमित केले आहेत. गावात पुरेसा अन्नधान्यसाठा, जीवनावश्यक वस्तू व औषधे, फळे व भाजीपाला, दूध उपलब्ध आहे. महसूल विभागाचे कर्मचारी त्याबाबत योग्य ती दक्षता घेत आहेत.
(६) लोकांनी शक्यतो घरातच थांबावे. आवश्यक कामासाठी बाहेर पडताना तोंडावर मास्क वा रुमाल बांधावा. यांबाबतच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवत आहे.
(७) भाजीपाला खरेदी करण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक गावात वेगवेगळ्या ठिकाणी अस्थायी स्वरूपात भाजी विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भाजी विक्री, दूध विक्री, किराणा दुकानांच्या बाहेर सोशल डिस्टन्सचे पालन होण्यासाठी १ मीटर अंतरावर गोलाकार, चौकोनी खुणा करण्यात आल्या आहेत.
(८) कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
(९) अहमदनगरमध्ये जैन सोशल ग्रुप, संगमनेर लायन्स ग्रुप,
श्रीगोदयात उन्नती महिला संघ मार्फत गरीब, निराधार,
बाहेरगावचे मजूर यांच्या भोजनासाठी व्यवस्था करण्यात
आली आहे.
(१०) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य
संस्थांनी परिसर निर्जंतुकीकरण केला आहे.
दि. २८ एप्रिल २०२१ जिल्हाधिकारी अहमदनगर
(३) नमुना -०३
संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमाला.
“दूरस्थ शिक्षण मंडळ संचालित” संत
तुकडोजी महाराज प्रतिष्ठान आयोजित
व्याख्यानमाला पुष्प १५ वे
दि. २४ फेब्रुवारी २०२१
सन २०२१-२२ अहवाल
दूरस्थ शिक्षण मंडळ संचलित, संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेतील १५ वे पुष्प ‘चंद्रकला कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रांगणात २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता गुंफले गेले.’ व्याख्यानमालेचे हे १५ वे वर्ष होते. याआधी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींनी या व्याख्यानमालेत आपले विचार विदयार्थ्यांसमोर मांडले आहेत. यापूर्वी डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, नाना पाटेकर, उज्ज्वल निकम, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर अशा अनेक मान्यवरांना संस्थेने आमंत्रित केले होते.
या वर्षी ‘एकविसाव्या शतकातील भारतापुढील आर्थिक आव्हाने’ या विषयावर विदयार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ ‘डॉ. नरेंद्र जाधव’ यांना आमंत्रित करण्यात आले होते.
व्याख्यानमालेची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या श्रीमती स्वाती आंबेकर यांनी गणेश वंदना सादर केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब बोराटे यांनी प्रास्ताविक मांडले. त्याचबरोबर संस्थेच्या या वर्षीच्या अहवालाचे वाचन केले.
अहवाल वाचन करताना दृक्-श्राव्य माध्यमाचा वापर केला गेल्याने अहवाल वाचन एका वेगळ्याच उंचीवर गेले. संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत नाडकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले, तसेच कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नरेंद्र जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ जाधव यांचा परिचय श्रीमती माने यांनी करून दिला.
विदयार्थ्यांना संबोधित करताना डॉ. जाधव यांनी भारताच्या स्वतंत्र दिवसापासून सुरुवात करत भारताच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेतला. १९९३ साली खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या जागतिकीकरण या त्रि-सूत्रीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम स्पष्ट केला. इतर देशांच्या विकास दराची आणि भारताच्या विकास दराची तुलानात्मक मांडणी त्यांनी करून दाखवली आणि भविष्यात भारतातील तरुण युवा वर्ग हा भारताचे सामर्थ्यस्थान ठरू शकणार आहे हे त्यांनी प्रतिपादित केले. शिवाय या युवाशक्तीला भरकटू न देता विधायक कामाकडे वळवणे ही शासनाची, समाजाची, शिक्षकाची, कुटुंबाची कशी जबाबदारी आहे ते त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी श्री. नरवणे यांनी आभार प्रकटीकरण केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दि. २८ फेब्रुवारी २०२१. सचिव अध्यक्ष
प्रास्ताविक:
विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील अभिक्षमता वाढवण्यासाठी शालेय, महाविदयालयीन क्रीडास्पर्धा, जीवनात वक्तृत्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, स्नेहसंमेलने यांसारखे अनेकविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याप्रमाणे शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम संपन्न होत असतात. वर्तमानकाळातील नोंदी ठेवण्यासाठी कार्यक्रम झाल्यानंतर अहवाल लिहिले जातात. हे अहवाल जुने दस्तऐवज म्हणून भावी काळात उपयोगी पडतात.
अहवालाची व्याख्या (Definition of Report):
(१) एखादया कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभांची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय.
(२) वस्तुस्थिती आणि माहितीच्या आधाराने तयार केलेली लेखी स्वरूपातील निवेदने म्हणजे अहवाल होय.
अहवाल स्वरूप (Form OF Report):
हे धावपळीचे युग असल्याने अशा परिस्थितीत व्यक्तिगत संपर्क साधून काम पूर्ण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे लेखी संपर्काला महत्त्व प्राप्त झाले आहे. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद, समारोप अशा सर्व घटना, प्रसंगांचा समावेश केलेला असतो. माहितीची पद्धतशीर मांडणी करून वस्तुस्थिती निर्देशित करणे हा अहवालाचा प्रधान हेतू असतो. कार्यक्रम, समारंभ सुरू झाल्यापासून तो कार्यक्रम, समारंभ संपेपर्यंत इत्यंभूत घटनाक्रमानुसार कसा पूर्ण होत गेला याची योग्य व खात्रीशीर तपशिलांसह लेखी नोंद अहवालामध्ये केली जाते.
आवश्यकता (Importance Report):
माहितीचे शिस्तबद्ध जतन करण्यासाठी अहवालाची
उपयुक्तता आहे. भविष्यकाळात संस्थेचा इतिहास, परंपरा इ. माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम, समारंभ,
विशेष उपक्रम यांच्या लिखित नोंदी अद्ययावत गरजेचे असते. भविष्यकालीन तरतुदीसाठी या बाबी अत्यंत आवश्यक असतात. बाह्य जगाशी संपर्क साधण्यासाठी उदा. | विविध संस्था, लहान-मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची आवश्यकता असते. एखादया समस्येचे निराकरण करून अचूक निर्णय घेण्यासाठी अहवालाची नितांत गरज असते. प्रकल्प अथवा | सार्वजनिक क्षेत्रांत महत्त्वाकांक्षी उद्योग अथवा उपक्रम नव्याने सुरू करण्यासाठी त्या संदर्भातील योग्य माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते.
अहवालांचा आराखडा (Structure of a Report):
कार्यक्रम, समारंभ, सहकारी संस्था, उद्योगधंदे इ. वरून अहवाल लेखन रचनेमध्ये बदल घडतो. नेमका कोणता अहवाल लिहायचा आहे. त्यावर अहवाल लेखनाचा आराखडा निश्चित केला जातो. एखादया संस्थेच्या कार्यक्षेत्रविषयानुसार अहवालाच्या आराखड्याचे मुद्दे बदलतात. महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धेच्या अहवालाच्या आराखड्यातील मुद्दे स्पर्धेच्या स्वरूपावरून बदलताना दिसतात. विषयाच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन, त्यांची रचना, त्यांचे घटक, मुद्दे, क्रम यांमध्ये काही प्रमाणात बदल होतात.
अहवालाची प्रमुख चार अंगे:
(१) प्रास्ताविक (अहवालाचा प्रारंभ)
(२)अहवालाचा मध्य (विस्तार)
(३)अहवालाचा शेवट ( समारोप)
(४)अहवालाची भाषा
अहवालाचा विषय :
अहवाल लेखन आराखडा मुद्द्याच्या स्वरूपात पाहताना काही बाबी नेटकेपणे हाताळणे गरजेचे आहे. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप’ समारंभाचा अहवाल. या पंधरवड्यात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचा एकत्रित अहवाल लिहावा.
(१) प्रास्ताविक:
प्रास्ताविकमध्ये विषय, मुद्दे यांचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे असते. समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव-पद, प्रमुख पाहुण्यांचे नाव-पद, समारंभाच्या आयोजकाचे नाव – पद, अन्य उपस्थितांचा उल्लेख. या सर्वांचे शाब्दिक स्वागत, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन / स्वागत गीत यांचा उल्लेख प्रास्तविकामध्ये केला जातो.
(२) मध्य : मराठी भाषा संवर्धन निमित्ताने पंधरवड्याचे उद्दिष्ट, कामाचे नियोजन, सहभागी व्यक्ती, उपक्रमाविषयी माहिती, उपक्रमामुळे साध्य झालेल्या बाबींवर प्रकाशझोत टाकणे, भविष्यकालीन संकल्प नियोजनाची रूपरेषा यांबाबतीतील क्रमबद्धता | सांभाळून मुद्देसूद स्पष्टीकरण करणे अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगत लिहिणे गरजेचे ठरते. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर विचार, मते, अध्यक्षाचे भाषण, निवडक उपक्रमाच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषिक वितरण समारंभाचा उल्लेख यांचा समावेश | असावा. (साधारणत: दोन, तीन उपक्रम असावेत)
(३) समारोप : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा मुख्य उद्देश कितपत साध्य झाला हे सहभागी लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे कोणताही समारंभ अथवा कार्यक्रमामधील उल्लेखनीय बाबी, उणीव आणि यशस्विता या बाबींतील नोंदी, निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते.
(४) अहवालाची भाषा :मराठी भाषेचे स्थान, त्याचे महत्त्व, सदयस्थिती या बाबतीत या पंधरवड्यात आयोजित केलेले उपक्रम आणि समारंभ यांना अनुसरून सुसंगत, योग्य अशा औपचारिक भाषेत अहवाल लिहावा. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालामध्ये योग्य ठिकाणी विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या-त्या क्षेत्रांतील अहवालाची भाषा विकसित झालेली असल्याने अशा ठराविक भाषेचा वापर अहवाल लेखन करताना केला जातो असे प्रकर्षाने दिसते.
अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये:
संस्था अथवा व्यावसायिक क्षेत्रातील सदयस्थिती समजावून घेण्यासाठी अहवाल लेखनाची गरज असते. अहवाल लेखन ही कला असून विशिष्ट रचनापद्धतींचा वापर कौशल्याने करावा लागतो. अहवाल लेखनाचे काम जवाबदारीचे असल्याने तो तयार करताना कस लावावा लागतो. अहवालाचे महत्त्व लक्षात घेता तो आदर्शवादी असायला हवा. त्यासाठी उत्तम अहवालाची गुणवैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.
(१) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता: वस्तुस्थितीचे दर्शन होईल याची दक्षता घेऊन अहवाल लेखन केले जाते. स्वरूपानुसार तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे इ. वस्तुनिष्ठ गोष्टींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. नोंद केलेल्या सर्व बाबी सुस्पष्ट असतात.
(२) विश्वसनीयता :अहवालातील अचूक माहितीमुळे आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. अहवालाचा उपयोग अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये पुरावा म्हणून केला जातो. हे अहवालाचे खास असे वेगळेपण असते. :
(३) सोपेपणा : अहवालातील भाषा सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीला अहवालातील आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून अहवाल लिहिला जातो. अहवालाचा अर्थ सहजासहजी समजेल अशी भाषा असते. तांत्रिक आणि बोजड शब्द फारसे वापरले जात नाहीत. आलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती किंवा साहित्यिक रचनेच्या गोष्टी अहवालात टाळल्या जातात. परंतु अहवाल क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया यांविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात.
(४) शब्दमर्यादा: अहवाल विषय आणि स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवर अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील त्यामध्ये अहवाल खूपच विस्तारपूर्वक लिहिले जातात. त्यामधे पुष्कळ माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवले जातात. एखादया समारंभाचा अहवाल तीन – चार पृष्ठांचा असतो. तर एखादया अर्थाचा अहवाल १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.
(५) नि:पक्षपातीपणा: अहवालाचा विषय, प्रकार कोणताही असला तरी एकूणच अहवालाचे एक सामाईक वैशिष्ट्य म्हणजे निःपक्षपातीपणा आहे. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. कार्यक्रम, समारंभ, सभा, संस्था, संशोधन यांमध्ये लेखकाने वास्तवदर्शी काय अनुभवले, पाहिले, ऐकले यांविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात आलेले असते.
अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी:
अहवाल लेखनाचा लालित्यपूर्ण साहित्यप्रकारात समावेश होत नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य ‘द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीईंग शेप्ड् हर क्लासरूम्स !’ (भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे!) असे आहे. अशा प्रकारची मागदर्शक व प्रेरणादायी वाक्ये, विचारांमुळे अहवाल लेखनाला लालित्याचा स्पर्श होऊन आवश्यकतेनुसार त्यांचा उपयोग करता येतो.
•अहवाल लेखन करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.
(१) अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला त्या विषयाची चांगली
जाण असली पाहिजे.
(२) घडलेली घटना क्रमानुसार व इत्यंभूत लिहिणे अहवाल
लेखनात अपेक्षित आहे.
(३) अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते.
खास करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाल लेखन
करताना बोलके व सजीव चित्र उभे करणे आवश्यक असते
तर संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालामध्ये योग्य
पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठतेला महत्त्वाचे स्थान
आहे.
(४) सारांशरूपात लेखन करणे आवश्यक आहे.
(५) अति आलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीयुक्त वर्णन न
करता सहज, सोपी, नैसर्गिक लेखनशैली असावी.
(६) व्यक्तींची नावे, व्यक्तींची पदे चुकीची देऊ नयेत. घटनाक्रम
अचूक असावा. अहवाल लेखन करताना आवश्यक तांत्रिक
गोष्टी (मथळा, तारीख, वेळ, स्थळ, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष,
नावे, पदे इत्यादी) यांचा विसर पडू देऊ नये.
(७) अहवाल लेखनाच्या विषयाचे स्वरूप, वेगळेपण, वैशिष्ट्ये
बारकाव्यासहित टिपली पाहिजेत त्यासाठी अहवाल लेखन
करणाऱ्या व्यक्तीकडे सूक्ष्म आकलन शक्ती, निरीक्षण शक्ती
असणे गरजेचे असते.
(८) अहवाल लेखनात विषयाला विसंगत असलेले स्वविचार असू
नयेत.
(९) संबंधित कार्यक्रम आणि विषयांच्या स्वरूपानुसार अहवाल
लिहिलेला असावा. तो पूर्ण असावा, विस्कळीत असू नये.
(१०) अहवाल लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्ष
व सचिव यांची मान्यताप्राप्त स्वाक्षरी असणे आवश्यक
आहे.
समारोप:-
अहवाल हे त्या त्या संस्थेतील कार्यक्रमाचे महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने त्यांचे लेखन योग्य ती दक्षता घेऊन करणे गरजेचे असते. संस्था तसेच कार्यक्रमाच्या कार्याचा दीर्घकालीन आढावा घेण्याकरिता त्यांचा वापर होतो. त्यामुळे त्यांचे जतन केले जाते.