Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter Bhag 3: कथा-साहित्यप्रकार-परिचय (Katha- Sahityaprakar-Prichay )


Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter Bhag 3 . Solutions  कथा-साहित्यप्रकार-परिचय ( Katha-
Sahityaprakar-Prichay  Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter  Bhag 3: कथा-साहित्यप्रकार-परिचय
12th Marathi Guide Prashn uttar Chapter  Bhag 3: कथा-साहित्यप्रकार-परिचय   Textbook Questions and Answers.

★ कृती – २. उत्तरे लिहा.

(अ) कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तरः कथेत केवळ प्रसंग पात्र, वातावरण, विचार यांचे स्पष्टीकरण नसते तर त्याचा सुयोग्य मिलाप असतो. पूर्वी एखादी शिकवण देण्यासाठी कथालेखन केले गेले, त्यानंतर मनोरंजनपर कथा लिहिली गेली. एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना, आत्ममग्नावस्था अशा विविध स्वरूपांच्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा काळाप्रमाणे लिहिल्या गेल्या.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(आ) कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तरः कथा ही पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक प्रकटीकरण असते. यातील सर्वच घटक महत्त्वाचे असतात. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कथानक. कथानकाच्या विस्तारातून कथाबीज मिळते.

कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडले जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक विस्ताराने मांडताना त्यामध्ये प्रवाहीपणा जपला जातो. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. असल्याशिवाय कथेत रंजकता येत नाही.

कथेमध्ये पात्र म्हणून पात्र हा महत्त्वाचा घटक आहे. पात्रचित्रण निवेदक करत असतो. कथेत सर्वच पात्र नायक, नायिकांची भूमिका पार पाडत नाहीत. पात्रांच्या संवादाद्वारे, प्रसंगाद्वारे कथानक पुढे पुढे सरकत असते. पात्रांची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती यांच्या चित्रणातून कथालेखक त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. ही शब्दरूप प्रतिमा पात्र म्हणून कथेत शब्दरूपाने वावरते. वास्तवातील ती पात्रे वाटावीत इतकं त्यांना शब्दरूपाने जिवंत केले जाते. ती वाचकांना खरीखुरी वाटतात.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

उदा. घ्यायचे झाले तर अकरावीच्या पाठ्यपुस्तकामधील ‘वहिनींचा सल्ला’ ही कथा आपण लक्षात घेऊ. सख्ख्या बहिणी असलेल्या या कथेतील दोन स्त्रिया म्हणजे दोन विचारांचे स्वतंत्र प्रवाह. समाजात पूर्वापार परंपरेत चालत आलेला स्त्रीविषयक विचार हा उषावहिनींच्या विचारातून डोकावतो. तो सर्वांनाच हवाहवासा वाटणारा. निशावहिनी जेव्हा बंडखोरीचे, समानतेचे विचार लोकांना सांगत होत्या तेव्हा त्यांचे विचारही बायकांना पटत होते. स्त्री-पुरुष समानतेचे विचार लोकांनाही पटत होते.

दोन वेगळे स्वतंत्र विचार पण तरीही दुसरा स्त्रीपुरुष समानतेचा विचार आताच्या काळात सुसंगत आणि समान हक्क, न्याय देणारा, तो रुजायला हवा. यासाठी उषावाहिनी, निशावाहिनी या दोन पात्रांद्वारे हा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात नाट्य आणण्यासाठी उषावहिनीचे स्टुलावरून पडणे, कार्यक्रमाकरता निशाचे जाणे, तिथल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणे, अशा प्रसंगांतून, उत्तम संवादातून हे कथानक आपल्यासमोर येते. तसंच उषावहिनी, निशावहिनी, ड्रायव्हर, मेकअप करणारी मंडळी, डॉक्टर, प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया या पात्रांना लेखकाने या कथेत आणल्यामुळे ती कथा जिवंत उभी राहते.

(इ) कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तरः कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण कथेची वैशिष्ट्ये मांडत असताना कथा मनोरंजन, सुसंस्कार करते. तसंच ती वाचकांची उत्कंठा वाढवते. जीवनाचा वेध घेते, तिचे सादरीकरण करता येते. इत्यादी वैशिष्ट्ये सांगितली जातात.

कथा आपल्या सर्वांचेच / वाचकांचे मनोरंजन करते. जगातल्या मौखिक परंपरेत कथा हा साहित्यप्रकार फार पूर्वीपासून रुजलेला आढळतो. लोककथा ते आधुनिक, कथा, नवकथा हा भाग कथेच्या इतिहासाच्या दृष्टीने अभ्यासण्यासारखा आहे. विनोदी, गंभीर, गूढ, विचारप्रधान, भावनाप्रधान अशा सर्वच कथांमधून माणसांचे मनोरंजन होते. आपल्याकडे मोठी माणसे लहान मुलांना कथा सांगतात. रमतात, मुलंही कथेत रमतात ते त्यातील मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची आताच्या काळातली साधने ही विज्ञान तंत्रज्ञान यांच्यामुळे विकसित झाली. पण लोककथा, लोकनाट्य या कला आपल्याकडे पूर्वापार असलेल्या लोकजीवनाचा भाग होत्या. कथा ज्या पद्धतीने सांगितली जाते, त्यालाही तितकंच महत्त्व आहे. मनोरंजन म्हणजे फक्त हसवणं नाही तर विचार करणं, ताणतणावातून मुक्त करणं, हसता हसता प्रबोधन करणं याही गोष्टी मनोरंजनात येतात. माणूस गोष्टीवेल्हाळ असतो. त्याला त्याच्याही जीवनात झालेल्या काही घटना, प्रसंग सांगायला कथन करायला आवडतात. एखादा माणूस गोष्ट सांगताना भारावून टाकतो तेव्हा त्याला ती गोष्ट वा कथा मनापासून आवडलेली असते. त्याला ती कथा सांगण्याची हातोटी छान जमलेली असते.

आपल्याकडे पंचतंत्र, इसापनिती, साहसकथा, संस्कार कथा अशा प्रकारच्या कथामालिकादेखील वाचायला मिळतात. कथेच्या माध्यमातून मनोरंजन, संस्कार होतात. पण त्यातून जीवनाचा वेधही घेतला जातो. कथा लिहिणारा, सांगणारा लेखक आपल्या, इतरांच्या प्राणिमात्रांच्या, जगातल्या घडामोडींच्या अंतराळाच्या जीवनाबद्दल आपल्या कथेतून जीवनपट सांगत असतो. ती त्या माणसाच्या जीवनकथेला स्पर्श करत असते. भिकायापासून ते राजापर्यंत कथेचे विषय असतात. तर एखादी कथा मी वर लक्ष केंद्रित करून त्यांच्या जीवनमूल्यांचा, आयुष्यातील चढउतारांचा वेध घेणारीदेखील असते. माणसाच्या आयुष्यातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेमध्ये असते. > कथेमध्ये कोणताही विषय त्याज्य

नसतो. तान्हुल्याला घास भरवताना आईने चिऊकाऊच्या गोष्टीतून मुलांच्या मनात कथेचे विश्व निर्माण करायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे कथेचे वेड बालपणीच रुजवले जाते. माणसाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होणारे भावनिक, मानसिक बदल त्याचा मनावर होणारा परिणाम, त्याला आलेले भलेबुरे अनुभव, त्याचे नातेसंबंध या साऱ्याचा कॅनव्हास कथेच्या माध्यमातून लेखक मांडण्याचा प्रयत्न करत असतो.

(ई) कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तरः कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. ही कला साध्य करता येते. आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या माध्यमांतून केले जाणारे कथाकथन लोकांना आकर्षित करते.

कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला उत्तम भाषा अवगत असणे गरजेचे आहे. तसंच वाचिक अभिनयाची, जोड असणं आवश्यक आहे. कथाकथनात कथेतील पात्र, कथानक, वातावरण हे शब्दांच्या माध्यमातून जिवंत करायचे असते. कथाकथन करताना कथा हातात नसते ती पाठ करावी लागते. कथाकथन करताना ती किती वेळात सादर करायची आहे त्याप्रमाणे कथा निवडावी लागते. कथा निवडताना अजून एक गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे कथेचा विषय, तिची मांडणी. काही कथा खूप चांगल्या असतात. खूप वैचारिक, चिंतनशील, अर्थगर्भ असतात पण त्या कथाकथनाच्या दृष्टीने मात्र कमकुवत ठरतात. कारण प्रेक्षकांना, रसिकांना अशा कथा ऐकताना रटाळ वाटू शकतात. संवादाने परिपूर्ण, चुटकेबाज, खुसखुशीत विनोदाची पेरणी केलेल्या पण

तरीही भाषेचे सौष्ठव जपणाऱ्या कथा रसिकांना आवडतात. काही वेळेस कथाकथनाकरता विषयही दिले जातात. उदा. विनोदी कथा, गूढकथा, स्त्रीवादी कथा, साहसकथा, विज्ञानकथा वगैरे मग अशा वेळेस अशा कथा लिहिणारे लेखक शोधणं गरजेचं असतं. अशा कथा निवडल्यानंतर त्यातून, ह्या कथेतून आपण रसिकांना काय देणार आणि कशाप्रकारे देणार हे ठरवावे लागते. पण अशा कथा सादर करताना सादरकर्त्याला त्या भाषेची, शब्दांची फेक लक्षात घेऊन सादर कराव्या लागतात. ते करताना आवाजाचे आरोह-अवरोह वापरणं अपेक्षित असतं. आवाजाची, उच्चारांची सुस्पष्टता आणणं गरजेचं आहे. जिथे कथा सादर करणार तो श्रोतृवर्गही कोणत्या वयाचा, विचारांचा आहे ते लक्षात घेणं गरजेचे आहे. तिथल्या ध्वनिपेक्षक रचना याचाही विचार करावा लागतो.

★ कृती – ३. कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तरः कथेच्या अंतरंगात कथानक, कथाबीज, संवाद, वातावरण, निवेदन, आरंभ-मध्य-शेवट हे घटक महत्त्वाचे असतात. तसंच कथेचे शीर्षकही महत्त्वाचे असते.

कथेत असणारा आशय हा शीर्षकातून प्रतिबिंबित होणे आवश्यक असते. पण त्याचबरोबर भलं मोठं शीर्षकही देणं उचित नसतं. शीर्षक आटोपशीर पण कथानकाचे सुतोवाच करणारे व कथानकाबद्दल उत्सुकता वाढवणारे असे असायला हवे. कथेच्या शीर्षकावरूनही कथालेखकाची कल्पकता, प्रतिभा दिसत असते त्यामुळे कथेच्या शीर्षकाबाबत कथाकार फार चोखदंळ असतो. ते निवडताना ते कथेशी सुसंगत, अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न कथाकाराचा असतो.

अकरावीच्या पाठ्यपुस्तकात ‘वहिनींचा सल्ला’ ही कथा अशीच उत्कंठा वाढवणारी ठरते.

★ कृती – ४. कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबत   
    तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तरः आपल्या परंपरेत कथा, नाट्य, काव्य या साहित्य प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या चालीरीती, रूढी परंपरा, संस्कृती यांचं पोषण कथा या साहित्यप्रकारातून झालेलं आपल्याला दिसतं. लहानपणीच्या गोष्टीतून संस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. साहस, रहस्य, रंजक, कल्पक, नीती, बोध यांची पेरणी कथांमधून करण्यात आली आहे. काळानुसार तिच्या आशयात, भाषेत, रचनेत बदल होत गेले. महायुद्ध, आक्रमणं, इझम्स, महानगरी जीवन, ग्रामीण जीवन अशा विविध पातळ्यांवर कथेतील विषय बदलत गेले. नवकथा हा एक नवीन प्रकार उदयास आला. आयुष्यातील पोकळी, निराशावाद, आयुष्याची क्षणभंगुरता यांचा विचार कथेमधून डोकावू लागला. काळ बदलतोय. स्त्री-पुरुष समानता, समलैंगिकता, तृतीय पंथियांचे प्रश्न, स्त्रीवाद, रिलेशन या विविध विषयांना स्पर्श करणारी कथा गेल्या चार-पाच वर्षांपासून लिहिली जात आहे. या कथांचा आकृतिबंध, रचनाबंधही आज झपाट्याने बदलत आहे.

कथाकार यामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवत आहे. कालौघानुसार कथेसाठी असलेला वाचक वर्ग, त्याची रसिकता, कथावाचनाची उत्सुकता बदललेली नाही. वेगळ्या पातळीवर कथालेखक प्रयोग करत आहेत आणि वाचकांनाही कथावाचनाचा आनंद देत आहेत.

आपल्या परंपरेत असलेल्या लोककथा ह्या मौखिक परंपरेत रुजलेल्या होत्या. प्राणिमात्रांच्या साहसाच्या, देवदेवतांच्या, रामायण, महाभारतातल्या कथा या आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. ब्रिटिशांनी मुद्रणकला भारतात विकसित केली आणि इथे छपाईयंत्रे आली. मुद्रणकलेचा विकास होत असताना संस्कृतमधील, महाभारत, रामायणमधील कथा मुद्रित होऊ लागल्या, इंग्रजी, अरबीमधील कथांचे भाषांतर, रूपांतर होऊ लागले. या कथा त्याकाळच्या नियतकालिकातून प्रसिद्ध व्हायच्या.

१८९० साली ह.ना आपटे यांनी ‘करमणूक’ या साप्ताहिकाची सुरुवात केली. त्यामधून या कथा प्रकाशित होत होत्या. या कथांचे स्वरूप स्फूटकथा, लघुकथा अशा स्वरूपाचे होते. या काळातील कथा, नीतीकथा, बोधकथा, दंतकथा ऐतिहासिक कथा, शृंगारिक कथा अशा स्वरूपाच्या होत्या.

अव्वल इंग्रजी कालखंडातील कथात्म वाङ्मयाला हरिभाऊ आपटे यांनी अद्भुतरम्यता, शृंगारिकता यांतून सोडवून सामाजिक प्रबोधनाकडे वळविले. त्यामुळे त्यांना ‘आधुनिक मराठी कथेचे जनक’ असे म्हटले जाते. १८८५-१९१० हा लघुकथेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

१९१० – १९२५ या कालखंडात शि. म. परांजपे, न. चि. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वा. म. जोशी या लेखकांनी कथालेखनात भर घातली. काशिताई कानिटकर, गिरिजाबाई, केळकर, आनंदीबाई शिर्के या लेखिकांनीही या काळात आपल्या कथालेखनाला प्रारंभ केला. निवेदनात विविधता, भाषेचा योग्य वापर, तरल अनुभव, जीवनानुभव या काळच्या कथेची वैशिष्ट्ये म्हणता येतात.

या सर्वच काळात कथेची लोकप्रियता टिकून राहिली. १९२० ते १९४० या कालखंडात मार्क्सवादी विचारांचा प्रसार होऊ लागला होता. भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात येत होती. सुशिक्षित स्त्रियांची संख्या वाढत होती. विभावरी शिरूरकर, कृष्णाबाई इत्यादी लेखिकांनी स्त्रियांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. र. वा. दिघे, ग. ल. ठोकल महादेवशास्त्री जोशी यांसारख्या लेखकांनी या काळात लेखन केले. फडके, खांडेकर यांचा कालखंड प्रमुख्याने मानला जातो. वामन चोरघडे, श्री. म. माटे, बी रघुनाथ यांच्या कथांनीही या काळातील कथालेखनाला समृद्ध केले.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात मात्र कथेतील आशय, रूपबंध यात प्रचंड फरक पडला. गंगाधार गाडगीळ, पु. भा. भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, दि. बा. मोकाशी इत्यादींच्या कथांतून जीवनातील अश्लीलता, दुर्बोधता, वैफल्यग्रस्तता, कुरूपता यांचा उल्लेख होऊ लागला. आधुनिक नागरी जीवनाचे चित्रण या लेखकांच्या लेखनातून झाले. या कथेला नवकथा असे म्हटले गेले. गंगाधर गाडगीळ यांना नवकथेचे प्रवर्तक मानले गेले. या काळात कथा अधिक वास्तववादी झाली. या काळातील वाचकवर्गालाही ती आवडली. आजच्या काळातील वाचकालाही ती आवडत आहे.

याच काळात ग्रामीण कथा, नागरी कथा, दलित कथा अशा स्वरूपाच्या कथा लिहिल्या गेल्या. द. मा. मिरासदार, आनंद यादव, उद्धव शेळके, मधु मंगेश कर्णिक या लेखकांनी कथेची परंपरा समृद्ध केली. केशव मेश्राम, योगिराज वाघमारे, अर्जुन डांगळे, उर्मिला पवार, भास्कर, चंदनशिव, अण्णा भाऊ साठे या लेखकांनी बलुतेदारी, ग्रामीण दलित, झोपडपट्टीतील मनुष्यवस्ती – त्यातील वास्तव, रस्त्यांवर राहणाऱ्यांचे वास्तव जीवन आपआपल्या कथेतून मांडले.

•कृती ५. प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ?

उत्तर :प्रभावी कथाकथन करण्यासाठी कथाकथनकाराने काही पूर्वतयारी करणे आवश्यक असते.

सर्वप्रथम त्याला वेळेनुसार कथा ठरवावी लागते. कथा जिथे सादर करायची तिथल्या विषयानुसार कथानिवड करावी लागते. कथा निवडली की ती त्या वेळेत बसत नसेल तर त्यातील काही भाग वगळावा लागतो. तो भाग वगळल्यावर कथेच्या आशयाला काही बाधा येत नाही ना? हे त्याला तपासून घ्यावे लागते. कथाकथनाकरता प्रेक्षक कोण आहे? हे त्याला तपासून घ्यावे लागते. कथाकथनाकरता प्रेक्षक कोण आहे? कोणत्या वयाचा आहे? याची माहिती मिळवून कथा ठरवावी लागते. उदाहरणार्थ लहान मुलांसमोर कथा सादर करायची असेल तर ती नारायण धारप, जी. ए. कुलकर्णी वगैरे लेखकांची घेऊन चालणार नाही. म्हणून श्रोतृ अंदाज घेणं महत्त्वाचे आहे. ही कथाकथन करण्यापूर्वीची तयारी झाली. प्रत्यक्ष कथाकथन करताना कथेनुसार आवाज, आरोह अवरोह सांभाळावा लागतो. श्रोतृवर्गाची उत्कंठा वाढवण्यासाठी प्रास्ताविक सांगून कथेला सुरुवात करावी. कथा सादर करताना ती साभिनय सादर करावी. आत्मविश्वासाने सादर करावी. कथेतील संवाद, निवेदन, वातावरण हे जिवंत करताना अभिनयाचा कस लागतो.

श्रोतृवर्गाशी नजरेनेदेखील संवाद करणे गरजेचे असते. श्रोतृवर्गावरची आपली पकड ढिली होऊ न देता त्यांचा कथेत अधिकाधिक रस वाढेल अशी निवेदनशैली असावी. कथा सादरीकरण करताना हातवारे, हुंकार, रसिकांशी संवाद या गोष्टींचाही वापर करावा. कथाकथन संपल्यावर रसिकांची मते विचारून घ्यावीत. त्रुटी झाल्या करावी. असल्यास पुढच्या सादरीकरणात सुधारणा करावी.

कृती – ६. तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा.

उत्तर: तुकाराम लांडगे हा पैलवान; पण भूतपिशाच्च, जादूटोणा, मंत्रतंत्र अशा गोष्टींवर विश्वास अमावस्येच्या रात्री माळावरच्या गाडीवाटेने खालच्या वस्तीकडे, त्याच्या गावी जायला निघतो. रात्रीचा अंधार, अमावस्येची रात्र व भूतप्रेत या गोष्टींवरील विश्वास या सर्वांमुळे त्याच्या मनात सारखा विचार येत असतो. ‘समजा धरले एकदम भुताने तर काय करायचे?’ अंधारातून चालताना भीतीचे काटे त्याच्या काळजात रुतत होते. एवढ्यात आपल्यापुढे कुणीतरी चालते आहे हे त्याला जाणवते. कुणीतरी आपल्यासारखा असेल तर ‘एकमेकांच्या नादाने, सोबतीने ही वाट तरी सरेल’ या विचाराने तो हाक देतो व आवाज ऐकताच ती व्यक्ती थांबते. या माळावरच्या वाटेवर ‘चला सोबतीला घावलं कुनी तरी’ म्हणून तुकारामाला आनंद होतो. ‘का हो ? सोबतीचं का काडलं? भेताबिता काय रातच्या चालीला?’ या प्रश्नावर तुकाराम उत्तरतो… ‘अवं, लई भुताचा तरास असतुया. आन् आज तर आमुशा हाय’ यावर पाहुणा तुकारामला म्हणतो. “मंग असंल !

काय करत्यात भूतं आपल्याला!” भुतांचा त्रास कसा असतो हे पाव्हण्याला सांगण्यासाठी तुकाराम त्याला गावातील सोनाराची व नगप्या आणि त्याच्या दोस्तांची गोष्ट सांगतो. गोष्टी सांगताना तुकारामाचीच घाबरगुंडी उडालेली असते. पाव्हणा मात्र हसत असतो. हसता हसता पाव्हणा तुकारामला विचारतो, ‘का वो पैलवान, ही भुतं आसत्यात तरी कुटं?’ यावर तुकाराम भुतांच्या अस्तित्वाच्या ठिकाणांची ऐकीव माहिती सांगतो. त्यावरून पाव्हण्याला एवढेच समजते की, ‘भुते कुठेही असू शकतात. पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत ती असतातच शिवाय विहिरीत हडळीचे वास्तव्य असते. पिंपळावर मुंजा असतो, वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करत नाहीत. रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. कुठल्याही वेषात ती येतात. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात.’

चालत चालत ते दोघेही पिंपरणीच्या झाडाच्या जवळ पोहोचतात तेव्हा पाव्हण्याला बिडी ओढायची लहर येते म्हणून आपण झाडाखाली विश्रांती घेऊया असे तो सुचवतो. एकट्याने पुढे जाण्याची भिती वाटत असल्याने तुकाराम मनात इच्छा नसतानाही त्याच्यासोबत तिथे थांबतो. तुकाराम व पाव्हणा झाडाखाली टेकून बसतात. तुकाराम पानाची चंची काढून पान बनवून खातो. तोंडातील पान संपल्यावर सहज त्याचं लक्ष पाव्हणा बसला होता त्या जागेकडे जाते आणि पाव्हणा तिथे नाही हे पाहून त्याला विलक्षण भीती वाटते. तो तेथून पळत सुटतो. गावात पोहोचतो तेव्हा चांगला घामाघूम झालेला असतो. विलक्षण धाप लागलेली असते. तो गावकऱ्यांना सांगतो, “माळावरच्या पिंपरणीखाली एका भुताशी गाठ पडली. त्याची नी तुकारामची कुस्ती झाली. त्यात भुताला चीतपट केलं म्हणून ते खवळून अंगावर आलं आणि माळ सरेपर्यंत मागे आलं.” तुकारामची गोष्ट गावकऱ्यांना खरी वाटते.

तुकाराम सोबतचा पाव्हणा वाऱ्यामुळे बिडी पेटत नाही म्हणून झाडाच्या पाठीमागे जातो. बिडी ओढतो. घाबरट तुकारामचे त्याला हसू येत असते. बिडी विझवून पाव्हणा झाडापाशी येतो. झाडाखाली तुकाराम बसला होता ती जागा त्याला रिकामी दिसते आणि पाव्हणा घाबरतो. इतका वेळ ऐकलेल्या भुतांच्या गोष्टींचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झालेला असतो. तो तेथून पळत सुटतो. पळत कुठल्यातरी वस्तीवर घामाघूम अवस्थेत जाऊन पोहचतो. अशाप्रकारे पिंपरणीखाली गैरसमजातून भुताचा जन्म होतो.

प्र.२. कथेची व्याख्या अशी करता येते…..

उत्तर : एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.

प्र. ३. स्वमत.

•कथेतील महत्त्वाचे असलेल्या घटकांबद्दल तुमची मते लिहा.

उत्तरः सांगायचे ते तो कधी वातावरण निर्मितीतून सांगेल तर

कथेमध्ये पात्रे, प्रसंग, संघर्ष गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली या सर्वांचे सुसंघटित प्रकटीकरण असते. प्रत्येक कथेत हे सर्व घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाण सारखे असेल असेही म्हणता येणार नाही. काही कथा पात्रांना प्रधान्य देणाऱ्या असतील, तर काही कथा प्रसंगांना प्राधान्य देणाऱ्या असतील. लेखकाला जे सांगायचे ते तो कधी वातावरण निर्मितीतून सांगेल तर

कधी संवादातून, निवेदनातून सांगेल. केवळ विचार नाही नाही. मिळत असतो.

तर भावनांचाही योग्य परिपोष कथांतून होणे गरजेचे असते. जर कथा ग्रामीण असेल, तिथले वातावरण असेल तर ते वातावरण निर्माण करण्यासाठी निवेदनात, संवादात त्या त्या प्रांतातील बोलीभाषांचा वापर करतात. कथा प्रसंगाचे वर्णन करत नाही, कथा व्यक्तीचे चित्रण करत नाही. एखादी भावना, विचार, दृष्टिकोन यांचे चित्रण कथा कधी करत नाही. ती एकांगी विचार देत विविधांगी विचारांचा, भावनांचा परिपोष कथेत मिळत असतो.

कृतिपत्रिका – २

•खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.

                                                      (सप्टें., २०२१)

उतारा: कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने******* कथाकाराची ‘स्व’ निर्मिती होते.
                   (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३ )

प्र. १. केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कथेतील पात्रांचे वाचकांशी जवळीक साधण्यामागील कारण       
      लिहा.

उत्तरः कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते.

(आ) कथानकाचे प्रयोजन लिहा.

उत्तर: कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.

प्र. २. कारणे लिहा.

•कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो, कारण.

(अ)……….

उत्तर: (अ) कथाकार आपल्या प्रतिभाशक्तीने एखादया घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो.

(आ) निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांच्या साहाय्याने घटनामालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते.

कृतिपत्रिका – ३

•खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.

                                                           (मार्च, २०२२)

उतारा: कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने *********कथाकाराची ‘स्व’ निर्मिती होते.
                                                  (पाठ्यपुस्तक पृष्ठ. क्र. ६३ )

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा.

उत्तर: कथाकाराच्या प्रतिभाशक्तीमुळे एखादया घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरता येतात.

(आ) कथानकाचे प्रयोजन लिहा.

उत्तरः कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.

प्र.२. कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा.

उत्तरः कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना एखादया पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनसृष्टी, जीवनपद्धती इत्यादी घटक विचारात घेतो.

●प्रास्ताविक ●

‘कथा’ या शब्दाचा शब्दश: अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, | वर्णन असा आहे. ‘कथ्’ या मूळ धातूपासून ‘कथा’ हा शब्द रूढ झाला आहे. ‘कथ्’ चा अर्थ आपले अनुभव, कल्पना दुसऱ्याला सांगणे, निवेदन करणे असा आहे. मौखिक परंपरेतून | सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या ‘कथा’ | या वाङ्मयप्रकाराची लक्षणीय अशी परंपरा मराठीत आहे. श्रवणीयता, मनोरंजन व अप्रत्यक्षपणे प्रबोधन ही कथा या | वाङ्मयप्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. कालानुरूप |मराठीतील कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली. समाज, संस्कृतीशी मराठी कथा बांधिल राहिल्याने मराठी | मनात लोकप्रिय राहिली.

कथा स्वरूप:

कथालेखन हेतू:

●प्रारंभीच्या काळात एखादी शिकवण / बोध देण्यासाठी कथालेखन.

●मनोरंजन वा एखादा विचार, भावना, घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथालेखन.

●कथेतील महत्त्वाच्या बाबी●

घटना, कथानक, पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचा | उल्लेख, समर्पक अशी निवेदनशैली, पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत उत्कर्षबिंदू (क्लायमॅक्स), समर्पक शेवट व सुयोग्य, उत्तम असे शीर्षक.

एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.

कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्व घटकांचे एक सुसंघटित असे प्रकटीकरण होय.

मराठी कथेची पर्वपीठिका :

आधुनिक मराठी कथेची पूर्वपीठिका ह. ना. आपटे यांच्या ‘करमणूक’ साप्ताहिकातील ‘स्फूट गोष्टी’ पासून होते. दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी अशा अनेक कथा ‘करमणुकी’ तून प्रकाशित झाल्या.

कालानुरूप मराठी कथेत अनेकविध बदल आले. आशय, अभिव्यक्ती व अधिकाधिक विषयांना स्पर्श करीत मराठी कथा बहुआयामी झाली. ग्रामीण कथा, दलितकथा, स्त्रीलेखिकांच्या कथा, गूढकथा, विज्ञानकथा अशा अनेक कथाप्रवाहांनी मराठी कथा विविधांगी बनली आहे.

कथा-अधिक अभ्यासासाठी उपयुक्त संकेतस्थळ दुवा. https:// mr. vikaspedia. in > education मराठी साहित्य कथा विकासपीडिया व hemantsadake.blogspost.com>blog…. मराठी कथा : Hemant

कथा घटक:

कथाघटकात खालील घटक महत्त्वाचे आहेत.

●कथाबीजः कथेतील मूळ घटनेला ‘कथाबीज’ असे म्हणतात. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने ‘त्या’ घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो.

●कथानक घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यादीचे तपशील कथानकात हळुवारपणे उलगडले जातात.

●पात्रचित्रण : पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. पात्राची कृती, वृत्ती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना यांतून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा वाचकांच्या समोर उभी राहते.

● वातावरण निर्मिती :स्थळ, काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय अशा वातावरण निर्मितीमुळे वाचक कथानकाशी एकरूप होतो.

● नाट्यमयता / संघर्ष : चांगल्या वाईटाच्या संघर्षातून, आनंद, सुखात्मिक अशा घटनांतून कथेचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो.

● संवाद : पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार अर्थपूर्ण संवादातून कथेला एक वेगळेपण प्राप्त होते.

●भाषाशैलीः कथेतील पात्राच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. याशिवाय प्रारंभ, मध्य, व शेवट असे कथेचे सर्वसाधारण तीन टप्पे मानले जातात. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते.

कथालेखन घटकात शीर्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते.

कथेची वैशिष्ट्ये:

मराठी भाषेतील कथादालन विविधांगी व अनेकविध गुणांनी समृद्ध असे आहे. मराठी कथेची अनेकविध वैशिष्ट्ये आहेत.

●कथा मनोरंजन करते: मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे कथा. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. कथा वाचणे, सांगणे, ऐकणे आनंददायक आहे. सर्वांना हवीहवीशी वाटणारी मराठी कथा.

कथेमुळे सुसंस्कार होतात: कथेच्या माध्यमातून मूल्यविचार रुजवाता येतात. संस्कारक्षमतेच्या वैशिष्ट्यामुळे सद्गुणांची शिदोरी (पाथेय) देता येते.

कथा वाचकांची उत्कंठा वाढवतेः कथेतील आकस्मित वळणे, नाट्यमय प्रसंग व कथेचा अनपेक्षित शेवट यामुळे उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. ‘आता पुढे काय होणार ?’ ची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते.

उदा. पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा.

●कथा एककेंद्री असते: अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रियत्व हे कथेचे महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्य आहे. कथेतील पात्रे, प्रसंग, वातावरण मर्यादित असते म्हणून तिचे स्वरूप स्फूट (लहान / छोटे) असते.

●कथा भूतकाळात लिहिली जाते: कथा म्हणजे होऊन गेलेल्या घटनेविषयीचे निवेदन असते. म्हणूनच सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते..

कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा ही जीवनस्पर्शी असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. जीवनातील घटनांचा, भावभावनांचा वैचारिक उलथापालथींचा धांडोळा (शोध) घेण्याचा प्रयत्न कथाकाराचा असतो. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते: सादरीकरण म्हणजे सादर करणे, सांगणे, कथन करणे.

मनोभावे सांगणे, एकचित्ताने ऐकणे ही देवघेव पूर्वीपासून चालत आली आहे. उद्याही ती सुरूच राहणार आहे.

कथेचे सादरीकरण

कथेच्या सादरीकरणाची कला योग्य प्रयत्नाने निश्चित साध्य करता येते.

● प्रकटवाचनाचा सराव, भाषेची योग्य जाण, शब्दोच्चार व सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत करता येते.

●अलिकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

● रंगमंचावरून सादर होणारे कथा अभिवाचनाचे कार्यक्रम, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांतून सादर केले जाणारे कथाकथन.

अभिवाचनः

अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवली जाते.

एकाचवेळी अनेकांकडून (दोन/तीन व्यक्ती) कथेचे अभिवाचन केल्यास आवाजाचा एकसुरीपणा टाळता येतो.

संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो.

पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना व नेपथ्याची जोड कथावाचनाला दिल्यास ती कथा श्रोत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते. कथाकथन :

● कथाकथनास अभिनयाची योग्य जोड दिल्यास कथाकथन उठावदार होते.

● शब्दांच्या माध्यमातून कथेतील पात्रांना प्रत्येक श्रोत्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे.

●कथाकथन करताना कोणत्याही प्रकारचा लिखित मजकूर हातात नसतो.

● श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत कथा श्रोत्यापर्यंत पोहचविणे महत्त्वाचे.

●कथेची योग्य निवड महत्त्वाची.

● कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचे अवधान

यांकडे लक्ष.

● शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता व शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे.

● कथेच्या सादरीकरणास योग्य तंत्रज्ञानाची जोड – सामाजिक संपर्काच्या माध्यमांचा वापर

समारोपः

मौखिक परंपरेपासून सुरू झालेला मराठी कथेचा प्रवाह आजही सक्षम स्वरूपात खळखळत राहिला आहे. मनोरंजन व नित्यनूतन अनुभव देण्याचे सामर्थ्य मराठी कथेत आहे. आशय, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण कला, मनोरंजन आणि बोध या गुणविशेषांमुळे मराठी कथा आजही लोकप्रिय आहे. मराठीतील अनेक कथा-लेखक, लेखकांनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने मराठी कथाविश्वात विविधांगी स्वरूपाची भरच घातली आहे. गोष्टीवेल्हाळ मानवी प्रवृत्तीमुळे आजही नानाविध लेखकलेखिकांच्या कथा वाचक, श्रोत्यांना एक निखळ आनंद देत राहिल्या आहेत.

Leave a Comment