मराठी भाषा : इतिहास : निबंध : वैशिष्ट्ये : थोरवी : मराठी भाषेचे महत्व – Marathi Language (Marathi Bhasha)

आपली मराठी भाषा आणि देवनागरी लिपी

तर मित्रांनो आजच्या लेखात आपण माहिती बघणार आहे मराठी भाषेची (मराठी भाषा) Marathi Language (Marathi Bhasha) ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाची असणार आहे या लेखात आपण बघणार आहे : मराठी भाषेची वैशिष्ट्ये, मराठी भाषेची थोरवी, मराठी भाषेचा इतिहास,मराठी भाषेची थोरवी निबंध, भाषा म्हणजे काय व्याख्या, मराठी भाषा कविता, मराठी भाषेची वैशिष्ट्ये, मराठी भाषा निबंध.

मराठी भाषा

मराठी भाषा : संवादाचे साधन

आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर ती गोष्ट आपण मागतो. ‘मला पाणी पाहिजे’, ‘मला पुस्तक हवे आहे’ असे आपण सांगतो. आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो. आपल्या हातांची ओंजळ करून ती ओठांजवळ नेऊन दाखवतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

त्यावरून ‘पाणी हवे आहे’ असे आपण सांगतो. मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो. आपल्या मनात अनेक विचार येतात, ते आपण शब्दांनी बोलून दाखवतो.

आपल्या मनात अनेक भावना येतात. कधी आपण आपुलकी दाखवतो. कधी आपणं रागावतो. अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो. आपल्या मनात अनेक कल्पना येतात.

त्याही आपण शब्दांतून व्यक्त करतो. आपण एकमेकांशी बोलतो. कधीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते. अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते.

पशुपक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसेल? चिमणी चिवचिव करते. कावळा काव काव करतो. गाय हंबरते. सिंह गर्जना करतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

घोडा खिंकाळतो. हे पशुपक्षीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात. ती पशुपक्ष्यांची भाषाच असते. भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते.

भाषेची अभिव्यक्ती

आपल्या मनात विचार येतात. आपल्या मनात भावना जागृत होतात. त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो, सांगतो. आपल्याला आश्चर्य वाटते तेव्हा आपण भुवया उंचावतो. आपल्याला नापसंती दाखवायची असते तेव्हा मान आडवी हलवतो किंवा हात हलवतो.

आपल्याला रागवायचे असते तेव्हा डोळे वटारतो. अशी आपली ही ‘हावभावांची भाषा’ असते.भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे – (१) स्वाभाविक किंवा नैसर्गिक (२) कृत्रिम किंवा सांकेतिक.मनुष्यप्राण्याची बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा यांची गणना नैसर्गिक भाषेत होते.

‘भाषा’ हा शब्द ‘भाष्’ या संस्कृत शब्दापासून आला आहे.आला असून त्याचा अर्थ ‘बोलणे’ किंवा ‘बोलण्याचा व्यवहार करणे’ असा आहे. आपल्या मनातील विचार ‘बोलून दाखवणे’ हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे.

तसेच, आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. ‘लिहिण्यासाठी’ आपण ‘लिपी’ वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे ‘लेखन’ शक्य झाले आहे.

मराठी भाषेचे महत्त्व

Marathi Language भाषा हे संवादाचे एक प्रभावी साधन, माध्यम आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.

आपले विचार, भावना, कल्पना, अर्थच्छटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक असते. हे आपले बोलणे, आपले विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते.

भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषेमुळे आपले सर्व जीवनव्यवहार सुरळीत होत असतात. भाजी मंडईतील भाजी आणण्यापासून एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासापर्यंत भाषा आपल्याला साथ करते. आयुष्यभर भाषा आपल्याला आपल्या विकासासाठी मदत करते.

व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासातही भाषेचे योगदान मोठे आहे. समाजाच्या विकासात अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ, कवी, लेखक यांचा सहभाग असतो.

त्यांचे विचार जतन करण्याचे काम भाषा करते. विविध लहानमोठी कामे करणारी माणसे समाजात असतात. अशा असंख्य माणसांच्या जडणघडणीत भाषेचे योगदान असते.

आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते.शालेय अभ्यासात किंवा महाविद्यालयीन अभ्यासात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात.

गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, जमाखर्च, पत्रव्यवहार, स्थापत्य शास्त्र, कायदा, न्यायव्यवस्था, औषधशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास भाषेच्याच माध्यमातून आपण करतो. म्हणून भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन त्या भाषेच्या अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

मातृभाषा मराठी (Marathi Language)

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय. बालपणापासून आई, वडील, आजी, आजोबा, शेजारी यांचे बोलणे आपल्या कानांवर पडत असते.

अनेक शब्द, वाक्ये आपल्या कानांवर पडत असतात. आजूबाजूच्या जगाची ओळख मातृभाषेतून आपल्याला होते. लहान मूल हजारो शब्दांतून या जगाची ओळख करून घेते.

आईच्या सहवासातून, आईच्या शब्दोच्चारातून तिने म्हटलेल्या गाण्यांतून, संस्कारांतून मुलाची जडणघडण होते. या अर्थाने मातृभाषा आणि बालपण यांचे नाते महत्त्वपूर्ण आहे.

हे नाते हळुवार आहे, कोमल आहे, तसेच विचार, भावना, कल्पना यांचे भरणपोषण करणारेही आहे. मराठी आपली मातृभाषा आहे.

लहानपणापासून मराठी या आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानांवर व मनावर होतात.महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे.

महाराष्ट्रातील हजारो खेड्यांमधून व शहरांतून मराठी भाषा बोलली आहे. या महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा समृद्ध आहे. अनेक शेतकरी, कामकरी, अनेक व्यावसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केली आहे.

भाषेचे हे महान वैभव आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. महाराष्ट्राबद्दल व मराठीबद्दल आपण मनापासून कृतज्ञता बाळगली पाहिजे.मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे.

‘मराठी’ वर प्रभुत्व मिळविणे, बिनचूक वाक्यरचना करणे, डोळसपणाने भाषेचा उपयोग करणे हे आपल्याला आवश्यक आहे.

त्याशिवाय या विषयाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. विद्यार्थ्याने शालेय अभ्यासात मराठी या विषयाच्या अभ्यासाबरोबरच मराठी वाङ्मयाच्या वाचनाकडेही लक्ष दिले पाहिजे.

मराठीविषयी काही माहिती (Marathi Mahiti)

मराठी भाषा आणि इतिहास : मराठी भाषा एक समृद्ध अशी भाषा आहे. संस्कृत भाषा ही मराठीची जननी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्रीगोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो.

‘श्री चावुण्डरायें करवियलें’ ही शिलालेखातील ओळ म्हणजे मराठीतील पहिले उपलब्ध वाक्य होय. इ. स. ९८३ च्या सुमारास हे वाक्य तेथे कोरले गेले असावे.

मराठी भाषेतील वाङ्मयाची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. लिखित वाङ्मयाबरोबरच लोकवाङ्मयाचीही परंपरा आहे.

“माझा मऱ्हाटाचि बोलू कवतिके।परी अमृतातेही पैजेसी जीके। ऐसी अक्षरेंची रसिके। मेळवीन । ।

अशी प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली आणि ती तडीस नेली. ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ लिहिणारे आद्यकविकीर्ती मुकुंदराज, ‘श्री ज्ञानदेवी’ आणि’अमृतानुभव’ हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली. ‘लीळाचरित्र’ हा आद्य गद्य ग्रंथ लिहिणारे म्हाइंभट मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होत.

‘मराठी असे आमुची मायबोली’

मराठी भाषा आणि निबंध : असे प्रत्येक मराठी भाषकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठीतून बोलणे, मराठीतून पत्रव्यवहार करणे, मराठीतून व्यवहार करण्याचा आग्रह धरणे, मराठी वृत्तपत्रे, मराठी ग्रंथ यांचे वाचन करणे, गराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. आपली मराठी भाषा आपण बिनचूक बोलणे आवश्यक आहे. तसेच मराठीतून बिनचूक लिहिताही आले पाहिजे.

शास्त्रीय ग्रंथ, वैचारिक वाङ्मय, शासकीय पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, सभासंमेलने, व्याख्याने, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी ठिकाणी जी मराठी भाषा सामान्यपणे वापरली जाते ती प्रमाण भाषा मानली जाते.

मराठी मातृभाषा असलेले आपले बांधव मराठीची कोणती तरी बोली बोलत असतात. आदिवासी किंवा डोंगराळ भागात बोलली जाणारी मराठीची बोली खूपच निराळी असते.

त्या सर्व मराठी भाषेच्याच बोली होत. या बोलीभाषाही प्रमाण भाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रमाणभाषेपेक्षा वेगळ्या आहेत. त्या कमी प्रतीच्या नाहीत. आपण त्याही बोली ऐकल्या पाहिजेत. समजूनही घेतल्या पाहिजेत. अशा बोलीभाषेचा उपयोग करून निर्माण झालेले साहित्यही वाचले पाहिजे.

आपली भाषा आपली लिपी

आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो, तसेच लिहूनही दाखवतो. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झाले आहे. त्यामुळेच आपल्याला महान ग्रंथ आज वाचणे शक्य होत आहे. मराठी ही आपली भाषा आहे.

आपण जी लिपी वापरतो तिचे नाव ‘देवनागरी लिपी’ आहे. ‘बाळबोध लिपी’ असेही तिला म्हणतात.

आपली ही देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे. लेखकाच्या डावीकडून उजवीकडे तिचे लेखन होते.

आपण ओळ लिहितो. तिचा प्रारंभ डावीकडे होतो आणि अखेर उजवीकडे होतो. एक ओळ लिहून झाली की दुसरी ओळ आपण त्या ओळीच्या खाली लिहितो. शब्द लिहून झाला की त्यावर शिरोरेघा देण्याची पद्धत आहे.

ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो व प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी.

त्या दृष्टीने पाहता इतर लिपींपेक्षा आपली देवनागरी लिपी पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी म्हणण्याचे कारण यातील ‘ई’ व ‘उ’ हे दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखविण्याची सोय नाही. शिवाय च, ज, झ हे वर्ण दोन तऱ्हांनी उच्चारले जातात.

हे दोष सोडले तर देवनागरी लिपीत बहुतेक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत.आपण देवनागरी लिपीचा चांगला सराव केला पाहिजे. तसेच देवनागरी लिपीचे सौंदर्य आत्मसात केले पाहिजे.

आपण मराठीत जे लिहितो ते चांगले वाचता आले पाहिजे. आपले अक्षर सुंदर असले पाहिजे. आपल्याला वेगाने वाचता आले पाहिजे. वाचलेले समजले पाहिजे.

आपल्याला वेगाने व सुंदर अक्षरात लिहिता आले पाहिजे. आपले लेखन बिनचूक असले पाहिजे. दोन शब्दांत अंतर ठेवणे, विरामचिन्हांचा योग्य रितीने उपयोग करणे, परिच्छेदरचना करणे या गोष्टींचे भान ठेवून आपल्याला लेखन करता आले पाहिजे.

आपण भाषा कशी शिकतो ?

आपण भाषा शिकतो तरी कशी? आपल्या कानांवर लहानपणापासून अनेक शब्द, वाक्ये पडत असतात. ते आपण ऐकतो. त्या शब्दांचे, वाक्यांचे अनुकरण करून आपण बोलतो. तसेच एकमेकांशी आपण बोलतो.

आपण काही अक्षरे, शब्द, वाक्ये पाहातो. त्यांचे आकार, अर्थ आपण लक्षात घेऊन त्यांचा उच्चार करू लागतो.

आपले वाचन असे सुरू होते. त्या अक्षरांप्रमाणे आपण लिहू लागतो. आपल्या मनातील विचार आपण लिहू लागतो. अशा साऱ्या कौशल्यांवर आपण प्रभुत्व मिळवीत जातो.

श्रवणकौशल्य म्हणजे ऐकणे, भाषण-संभाषण-कौशल्य म्हणजे बोलणे, वाचन कौशल्य म्हणजे आपल्यासमोरील मजकूर वाचणे, लेखनकौशल्य म्हणजे सुंदर, सुवाच्य अक्षरात लिहिणे.

अशा कौशल्यांवर प्रभुत्व मिळवीत आपले भाषाशिक्षण सुरू असते.

गौरव मराठीचा

मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या काही कविता व उतारे पुढे आहेत. ते वाचा, त्यांचा अभ्यास करा.

मराठी भाषा कविता

मराठी असे आमुची मायबोली

जरी आज ती राजभाषा नसे

नसो आज ऐश्वर्य या माऊलीला

यशाची पुढे दिव्य आशा असे

हिचे पुत्र आम्ही हिचे पाङ्ग फेडू,

वसे आमुच्या मात्र हृन्मन्दिरी

जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे

हिला बैसवू वैभवाच्या शिरी.

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा,

नका फक्त पाहू हिच्या लक्तरा

प्रभावी फिकी ज्यापुढे अप्सरा

न घालू जरी वाङ्मयातील अञ्ची

हिरेमोतियांचे हिला दागिने

‘मराठी असे आमुची मायबोली’

वृथा ही बढाई सुकार्याविणे

– माधव जूलियन

गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो

स्फूर्ती दीप्ति धृतिही देत अंतरी ठसो

वचनिं लेखनीहि मराठी गिर

दिसो

सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनिं वसो

देह पडो

तत्कारणि ही असे स्पृह ।

श्री. कृ. कोल्हटकर

माझी मराठी असे मायाभाषा

हिच्या किर्तीचे तेज लोकी चढे

गोडी न राहे सुधमाजि आता,

पळाली सुधा स्वर्गलोकांकडे

जाईजुईची कळी कोवळी ही

परी साच झेलील हेमाद्रिला

फेडूनिया भ्रांति निर्मिल माझी

मराठीच शून्यातुनि क्रांतिला

आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी

कधी भ्यावयाचे, मुळी ना कुणा

आकंठ प्यालो हिचे दुध

अंगी पहा रोमरोमांतुनी या खुणा

तोडा चिरा दुग्ध धाराच येती

न हे रक्त वाहे शरीरातुनी

माझी मराठी मराठाच मी ही

असे शब्द येतील हो त्यातुनी

– नारायण गोविंद नांदापूरकर

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

– सुरेश भट

परभाषेतही व्हा पारंगत

ज्ञानसाधना करा, तरी।

माय मराठी मरते इकडे परकीचे

पद चेपु नका ॥

भाषा मरता देशही मरतो

संस्कृतिचाही दिवा विझे।

गुलाम भाषिक होऊनि

अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ॥

कुसुमाग्रज –

‘पृथ्वीवरील संपन्न व समर्थ भाषांपैकी मराठी ही एक आहे.

तिची प्राचीन काव्यसंपत्ती अलौकिक आहे व हीच तिच्या श्रीमंतीचे आद्य कारण आहे.

गद्य संपत्ती तिची यथातथाच आहे. संतमंडळींनी वैराग्याचा धगधगीत अग्नी पेटवून धर्मबुद्धि जागृत केली. हे महत्कार्य त्यांनी मायभाषेच्या आश्रयाने केले.

लोकव्यवहाराचा बहुतेक प्रांत यवनाक्रांत झाल्यावर ही धर्मसंरक्षणार्थ ‘आटी’ करणाऱ्या संतमहंतांनी मराठी बोला’ चे अमृत वळून मराठी घरांचे, भाषेचे व राष्ट्राचे परिरक्षण केले.

तेच ते आम्हा मराठ्यांचे अलौकिक पद्य सारस्वत!”आता भाषा अनेक आहेत, परंतु ज्या भाषेत आपला जन्म झाला, जी आपली आई-बाप, इष्टमित्र आदी हजारो वर्षे बोलत आले व जिच्याद्वारे आपण आपले नित्यव्यवहार चालवतो त्या महाराष्ट्र भाषेचा द्वेष करता कामा नये. तिचे भाषण आपणाला सहज समजते.

प्रसंगानुरोधाने ती प्रौढ, कठोर, कोमल, कठीण, भारदस्त व चंचल स्वरूप धारण करण्यासारखी आहे. इतर संस्कृत भाषांप्रमाणे तिलाही आपले विचार यथास्थित प्रकट करता येतात.

तेव्हा आपले एकमेकांचे विचार ह्या आपल्या मायभाषेच्या द्वारे आपल्याला सर्वोत्कृष्ट समजतील हे निर्विवाद आहे. देशाचा, धर्माचा व आचारांचा खरा अभिमान जागृत राहण्यास बोलणे, चालणे, लिहिणे, शिकणे व विचार करणे मराठीत झाले पाहिजे.

त्या शिवाय कर्तव्याचा पक्का व कायमचा ठसा आपल्या मनावर उमटावयाचा नाही.”

– इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (१८९४)

(१) भाषेचे महत्त्व स्पष्ट करा. (२) मातृभाषा मराठीचे महत्त्व स्पष्ट करा. (३) ‘मराठी असे आमुची माय बोली’ या विषयावर एक निबंध लिहा. (४) आपल्या देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये सांगा. (५) भाषेची कौशल्ये कोणती? त्या कौशल्यावर प्रभुत्व कसे मिळविता येईल? (6) मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगा ? (7) मराठी भाषेची थोरवी ? (8) मराठी भाषेचा इतिहास ? मराठी भाषेचे वैशिष्ट्ये ? (9) मराठी भाषा कोणत्या भाषाकुलातील आहे ? (10) मराठी भाषा का हिंदी में अनुवाद ? (11)महाराष्ट्र की भाषा ? (12) मराठी भाषा की वर्णमाला ? (13) मराठी भाषा कविता ? (14) ऑस्ट्रिक भाषेचे प्रामुख्याने किती भाग पडतात ? (15) मराठी भाषेची थोरवी निबंध ? (16) भाषा म्हणजे काय व्याख्या ?

तुम्हाला हे आर्टिकल (Marathi Bhasha) (Marathi Language) (मराठी भाषा) नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच (Marathi Language) मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >> maharashtraboardsolutions.net वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment